महाराष्ट्राची प्राकृतिक रचना


 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना 

महाराष्ट्र राज्याचे प्राकृतिक विभाग प्रमुख तीन आहेत.

१. कोकण किनारपट्टी 

२. सह्याद्री किंवा पश्चिम घाट 

३.महाराष्ट्र पठार 



१. कोकण किनारपट्टी 

    अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यान जो अरुंद पट्टा आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणतात.कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तर भागात जास्त तर  दक्षिणेकडे ती अरुंद होत गेली आहे. कोकण किनारपट्टीची लांबी दक्षिणोत्तर ७२० किमी आहे.तिची रुंदी मात्र सर्वत्र सारखी नाही.उत्तरेकडे काही भागात हि किनारपट्टी ९० किमी रुंद आहे तर दक्षिणेकडे काही भागात ४५ किमी. इतकी रुंद आहे.कोकण किनारपट्टीचा उतारपूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.

        कोकण पट्टीच्या अरूंद असल्यामुळे  कोकणात वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. कोकणातील नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.कोकणातील सर्वात लांब नदी हि वैतरणा आहे तिची लांबी १५४ किमी आहे. नदीतल्या मुखातून भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी नदीत शिरते. ते जिथपर्यंत नदीत शिरते त्या नदीच्या भागास खाडी म्हणतात. कधी कधी समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी जमिनीच्या सखल व चिंचोळ्या भागात शिरते ,त्या भागासही खाडी म्हणतात. तेरेखोल,विजयदुर्ग,राजपुरी,जयगड,दाभोळ,धरमतर, ठाणे आणि वसई ह्या प्रमुख खाड्या आहेत.

२. सह्याद्री किंवा पश्चिम घाट 

        सह्याद्रीस पश्चिम घाट असेही म्हणतात. पश्चिम घाट हा मुख्यतः बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. सह्याद्रीची सर्वसाधारणपणे उंची ९१५ ते १२०० मीटरच्या दरम्यान आहे. सह्याद्रीची रांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीस समांतर आहे. सह्याद्री हा मुख्यतः दक्षिणोत्तर पसरलेला आहे. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र,बालाघाट आणि महादेव या सह्याद्रीच्या प्रमुख रांगा आहेत. सह्याद्री पर्वतातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात उगम पावणाऱ्या  नद्यांपैकी गोदावरी आणि कृष्णा ह्या महत्वाच्या नद्या आहेत.

        पर्वतांच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरलेल्या असतात, तेव्हा त्या उंच लांब रांगांमद्ये काही ठिकाणी कमी उंचीचा भाग असतो त्याला खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणासाठी मार्ग काढतात त्यांना घाट असे म्हणतात.सह्याद्रीत थळ, बोर,कुंभार्ली,आंबा,फोंडा,आंबोली इत्यादी घाट आहेत.

३.महाराष्ट्र पठार

        समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचीवर असलेल्या सपाट प्रदेशाला पठार म्हणतात. महाराष्ट्र सह्याद्रीच्या पूर्वेला अशा प्रकारची उंच व सपाट भूमी पसरलेली आहे तिला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. हि विस्तीर्ण सपाट भूमी समुद्र सपाटी पासून सरासरी ४५० मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्र पठारावर अनेक लहान लहान पठारे व नद्यांची खोरी आहेत. पठारावर कृष्णा, गोदावरी तापी इत्यादी नद्या व त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. कृष्णा नदीचे खोरे, भीमेचे खोरे, गोदावरीचे खोरे, पैनगंगा-वर्धा-वैनगंगा खोरे, तापी-पूर्णा खोरे इत्यादी खोरे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या