महाराष्ट्रातील मृदा

महाराष्ट्रातील मृदा

                    मृदा व्याख्या: वनस्पतीच्या जीवनास आवश्यक असणाऱ्या आणि त्यांच्या वाढीसाठी पोषक द्रव्य पुरविणाऱ्या जमिनीच्या थरास मृदा असे म्हणतात.

                    मृदा हा जीवसृष्टीचा आधार आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते त्यामुळे वनस्पती जीवनावर अवलंबून असलेले प्राणी आणि मानवी जीवन त्या प्रदेशात समृद्ध असते. मृदा निर्मिती हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.  मूळ खडकाचे विदारण,हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश होतो  मूळ खडकाचे हळूहळू अपक्षय (विदारण) होऊन मृदा तयार होते. ज्या खडकाच्या विदारणातून मृदा तयार होते त्या खडकाचे गुणधर्म त्या मृदेत आढळतात.

                    

मृदा ही मुख्यत्वे चार घटकांपासून बनलेली असते:

1) खनिजे  द्रव्ये (45%)

2) सेंद्रिय द्रव्ये (5%)

3) जल द्रव्ये (25%)

4) वायू द्रव्ये (25%)


मृदेची सुपीकता:

            मृदेची सुपीकता हि जमिनीच्या सामू वरून ठरते. ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन सुपीक असते. अशा मृदेमध्ये पिकांची वाढ उत्तम होते.  मातीचा सामू म्हणजे जमिनीचे आम्ल आणि अल्कली गुण निर्देशित करणारे परिमाण मूल्य. जर जमिनीचा सामू सात असेल तर ती जमीन/मृदा उदासीन (Fundamental) असते. जमिनीचा सामू 7 पेक्षा अधिक असल्यास मृदा ही विम्ल (Antacid) असते व जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी असेल, तर ती जमीन आम्लधर्मीय (Acidic) असते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सर्व अन्नद्रव्ये पुरवतो.


मृदेत चुना टाकून सामू वाढविता येतो तर गंधक टाकून सामू कमी करता येतो.

जमिनीचे प्रकार 

१.आम्ल जमीन:

            या जमिनीचा सामू ६ पेक्षा कमी असतो. या जमिनीमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते.या जमिनीत कॅल्सिम मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होऊन हायड्रोजनप्रमाण अधिक होते यामुळे पिकांना पोषक द्रव्य कमी पडतात. या जमिनीत पोषकद्रव्य वाढविण्यासाठी चुना टाकतात.

२. क्षारयुक्त जमीन:

            कमी पावसाच्या व जास्त तापमानाच्या शुष्क प्रदेशात क्षारयुक्त जमीन आढळते.या जमिनीवर क्षार विरघळून जमिनीवर येतात.त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा थर जमलेला दिसतो. या जमिनीचा सामू ८.५ पेक्षा कमी असतो.या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. या जमिनीत कापूस, नारळ,बार्ली,पालक, शुगर बीट या सारखी प्रमुख पिके घेतात.

३. चोपण जमीन:

            जमिनीतील मातीतील कणांना १५% पेक्षा जास्त सोडियम चिकटले असेल तर त्या जमिनी चोपण बनतात. या जमिनीत सोडियमचे प्रमाण जास्त असते.चोपण जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही.जमीन कोरडी झाल्यावर टणक होते, जमिनीत हवा खेळती रहात नाही, त्यामुळे पिकांची योग्य वाढ होऊ शकत नाही.या जमिनीचा सामू ८.५ ते १० इतका असतो. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम(कॅल्शियम सल्फेट) चांगला उपयोगी पडतो. जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते.



महाराष्ट्रातील मृदा प्रकार 

१.जाडी भरडी मृदा 

            विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून हि मृदा तयार होते. पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर हि मृदा आढळते. उदा. अजिंठा, बालाघाट व शंभू महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण कमी असते.

.काळी /रेगूर मृदा :

            या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन झालेली आहे. राज्याच्या ७५% भागात रेगूर मृदा आढळते. 'टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट' या घटकामुळे मृदेस काळा रंग प्राप्त होतो. या मृदेत चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशियम ह्युमस या घटक द्रव्याचे प्रमाण जास्त असते.या मृदेत ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त असते. 

काळ्या मृदेत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे अतिसिंचनामुळे या मृदा दलदलीच्या बनतात. या मृदेत चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हि मृदा पाणी धरून ठेवते. त्यामुळे सिंचनाच्या साहाय्याने या मृदेत अनेक पिके घेता येतात.

            हि मृदा कृष्णा,भीमा,गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात आढळते. अजिंठा,, बालाघाट, शंभू महादेव डोंगरावरून नदी खोऱ्याकडे मृदेची जाडी वाढत जाते. तापी नदीच्या खोऱ्यात मृदेची सर्वाधिक जाडी ६ मीटर पर्यंत आहे .मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच पश्चिम विदर्भात यवतमाळ, अकोला, वाशीम, अमरावती जिल्हे या ठिकाणी ही मृदा आढळते. याप्रमुख्याने मृदेत प्रमुख पीक कापूस घेतले जाते त्याचबरोबर ज्वारी,बाजरी गहू,ऊस इत्यादी पिके घेतली जातात.

.जांभी मृदा : 

            जांभा खडकांवर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन ही मृदा तयार झाली आहे. लोह व ऍल्यूमिनिअमच्या संयुगामुळे या मृदेला लाल अथवा जांभा रंग प्राप्त होतो. या मृदेत नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेत लोह, ऍल्यूमिनिअम व टिटॅनियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच या मृदेत ऍल्यूमिनिअमचे साठे अधिक सापडतात. या मृदेचा सामू ७ पेक्षा कमी असतो.

कोकण किनारपट्टी भागात जांभई मृदा आढळते पूर्वेकडील काही भागातहि जांभी मृदा आढळते.

या मृदेतील भात, काजू व आंबा ही पिके महत्वाची आहेत.

.गाळाची मृदा : 

            या मृदेचा रंग फिकट पिवळा असतो.यात पोटॅशचे प्रमाण कमी असते.वाळूमिश्रित लोम प्रकारच्या या मृदेत सेंद्रिय द्रव व ह्युमसचे प्रमाण अधिक असते.तसेच या मृदेची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमतादेखील जास्त असते. तापी- पूर्णा,गोदावरी,भीमा,कृष्णा,पैनगंगा,वर्धा, वैनगंगा खोरे आणि कोकणातील नद्यांच्या मुखाशी गाळाची मृदा आढळते. गाळाच्या मृदेमध्ये प्रामुख्याने भात, नाचणी, पोफळी ही पिके घेतली जातात. त्याच बरोबर  ऊस, गहू, भाजीपाला ही पिके घेतली जातात.

.तांबडी/पिवळसर मृदा

            आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकावर अपक्षय होऊन ही मृदा निर्माण झाली आहे. या मृदेत लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. या मृदेत चुनखडी,कार्बोनेट, फॉस्फरिक ऍसिड,पोटॅश व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण कमी असते.यातून पाण्याचा निचरा चांगला होतो व ही मृदा रासायनिक खतांना लवकर प्रतिसाद देते. या मृदेत सुपीकतेचे प्रमाण कमी असते त्यामुळे शेतीसाठी ह्या मृदेचा उपयोग फार कमी होतो.

           चंद्रपूर,भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात हि मृदा प्रामुख्याने आढळते. या मृदेत बाजरी, भुईमूग,बटाटे, भात व प्रामुख्याने सागाची वने आढळून येतात.

६. दलदलीची मृदा 
महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर खाड्यांच्या मुखालगतच्या प्रदेशात दलदलीची मृदा आहेत.महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत खाड्यांच्या मुखालगतच्या प्रदेशात अशा प्रकारच्या मृदा आहेत.

मृदेची धूप 
            जमिनीच्या पृष्ठावरील मातीची एका जागेवरून दुसर्‍या जागेवर होणारे स्थलांतर म्हणजेच जमिनीची धूप होय. मुख्यतः जमिनीची धूप प्राणी व वनस्पती यांच्या हालचाली तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे होते. भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. हे विलग झालेले कण वारा व जमिनीवरून पावसाचे वाहणारे पाणी यांच्यासोबत वाहून नेले जातात आणि अशाप्रकारे जमिनीची धूप होते.

मृदेच्या धूपेचे प्रकार

१.चादर/ सलकढी धूप
        ज्या जमिनीचा उत्तर एक तर्फी व मंद स्वरूपाचा आहे. अशा जमिनीची चादर धूप होते.
महाराष्ट्र पठारावर अशा प्रकारची धूप होते.

२.नाली /ओघळी धूप 
         डोंगर उतारावर पाऊस पडल्यावर पावसाच्या थेंबांबरोबर मातीचे कण वाहत येतात. असे पाणी एकत्र येऊन नाली/ ओघळ तयार होते.  हे पाणी जमिनीच्या उतारामुळे वेगाने वाहत जाते त्यामुळे प्रवाहास गती मिळून ती सतत वाढत जाते व त्यामुळे भूपृष्ठाची आणखी झीज होते.

३.प्रवाहकाठची धूप  
          अशा प्रकारची धूप नदी तसेच नाले यांच्या वेगवान प्रवाहामुळे होते.पाण्याचा प्रवाह वाहत असताना त्यात पाणलोट क्षेत्राबरोबर सतत वाढ होत जाते व त्याच्या तळाच्या उतारामुळे त्याची गती देखील वाढत जाते. या  गतीमुळे प्रवाहाच्या तळाची तसेच प्रवाहाच्या दोन्ही काठाची आणखी झीज होत जाते, त्यामुळे प्रवाहाची खोली व विस्तार दोन्ही वाढत जातात.

मृदा धुपेची कारणे
१. जमिनीचा उतार
२. पावसाचे प्रमाण 
३. मृदेचा आकार 
४. वृक्षतोड 
५. चराऊ कुरणांचा अति वापर
६. स्थलांतरित शेती 
७. नद्यांना येणारे पूर 
८. वादळे/ जोराचा वारा
९. सतत एकाच पिकाचे उत्पादन 
१०. दूषित पाणी 

मृदा संधारण उपाय 
१. वृक्ष लागवड 
२. पीक फेरपालट 
३. आच्छादने 
४. बांध घालणे
५. जमिनीची काटकोनात नांगरणी करणे.
६. पायऱ्यांची शेती 
७. गवतांची लागवड करून तयार केलेले बांध 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या