प्राणी वर्गीकरण

प्राणी हा जीवांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे, जो पृथ्वीवरील महासागरांच्या खोलीपासून ते उंच पर्वतशिखरांपर्यंत सर्वत्र आढळतो. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष (70 लाख) प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे अशक्य आहे; त्यामुळे साम्य व फरकांच्या आधारे प्राण्यांचे गट व उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. आगामी MPSC/UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सामान्य विज्ञान (जीवशास्त्र) या विषयातील हा एक महत्त्वाचा घटक आहे.

1. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास (History of Animal Classification)

  • अ‍ॅरिस्टॉटल (ग्रीक तत्त्ववेत्ता) — सर्वांत प्रथम प्राण्यांचे वर्गीकरण केले. शरीराचे आकारमान, सवयी, अधिवास या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले. यांच्या पद्धतीला 'कृत्रिम पद्धत' म्हणतात.
  • वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत वापरणारे अभ्यासक: अ‍ॅरिस्टॉटल, थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस.
  • कालांतराने नैसर्गिक पद्धत अमलात आली — शरीररचना, पेशी, गुणसूत्रे, जैवरासायनिक गुणधर्म यांवर आधारित.
  • उत्क्रांतीवादावर आधारित वर्गीकरण पद्धत वापरणारे अभ्यासक: डॉब्झन्स्की, मेयर आणि अलीकडच्या काळात कार्ल वुज.

📌 वर्गीकरणाचे फायदे

1) प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. 2) एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी संपूर्ण गटाची माहिती मिळते. 3) प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. 4) प्राण्यांना ओळखणे सोपे व अचूक होते. 5) प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजते. 6) प्रत्येक प्राण्याचा अधिवास व निसर्गातील स्थान समजते. 7) प्राण्यांतील विविध अनुकूलनांची (adaptations) माहिती मिळते.

2. प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती (Traditional Method)

पारंपरिक पद्धतीनुसार शरीरात 'पृष्ठरज्जू' (Notochord) नावाचा आधारक अवयव आहे की नाही, या मुद्द्यावर आधारित प्राणिसृष्टीचे दोन प्रमुख विभाग केले जातात:

अ. असमपृष्ठरज्जू प्राणी (Non-chordates)

  • शरीरात पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो.
  • ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात.
  • चेतारज्जू असल्यास तो युग्मांगी, भरीव व शरीराच्या अधर बाजूस असतो.
  • हृदय असल्यास ते शरीराच्या पृष्ठ बाजूस असते.

आ. समपृष्ठरज्जू प्राणी (Chordates)

  • शरीरात पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो.
  • श्वसनासाठी कल्लाविदरे (Gill slits) किंवा फुप्फुसे असतात.
  • चेतारज्जू एकच, पोकळ व शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो.
  • हृदय शरीराच्या अधर बाजूस असते.

📌 लक्षात ठेवा — 'आदिजीवी (Protozoa)' बद्दल महत्त्वाचा मुद्दा

पारंपरिक पद्धतीनुसार असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 संघ मानले जातात, त्यात 'आदिजीवी (Protozoa)' या एकपेशीय सजीवांच्या संघाचाही समावेश होतो. मात्र रॉबर्ट व्हिटाकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी पद्धतीनुसार 'प्राणीसृष्टी' (Kingdom-Animalia) मध्ये फक्त बहुपेशीय (multicellular) प्राण्यांचाच समावेश केला जातो. त्यामुळे एकपेशीय आदिजीवी (उदा. अमिबा, पॅरामेशिअम) यांना प्राणीसृष्टीतून वगळून स्वतंत्र 'प्रोटिस्टा' सृष्टीत ठेवले जाते. म्हणूनच आधुनिक वर्गीकरणात असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे प्रत्यक्षात 9 संघ (रंध्रीय ते अर्धसमपृष्ठरज्जू) अभ्यासले जातात. हा फरक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो.

प्राणीसृष्टीचे प्रचलित (पारंपरिक) वर्गीकरण

3. रॉबर्ट व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार वर्गीकरणाचे आधारभूत मुद्दे

अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ रॉबर्ट व्हिटाकर यांनी 1969 साली सजीवांची 5 सृष्टींमध्ये (Five Kingdom) विभागणी केली. या आधुनिक पद्धतीत प्राण्यांचे वर्गीकरण करताना पुढील पाच आधारभूत मुद्द्यांचा वापर केला जातो:

अ. रचनात्मक संघटन (Grades of Organization)

  • जीवद्रव्य-स्तर संघटन (Protoplasmic grade) — एकपेशीय सजीव. उदा. अमिबा, पॅरामेशिअम.

जीवद्रव्य-स्तर संघटन

  • पेशीस्तर संघटन (Cellular grade) — बहुपेशीय पण ऊती तयार न झालेले प्राणी. उदा. रंध्रीय प्राणी.

पेशीस्तर संघटन

  • पेशी-ऊती स्तर संघटन (Cell-tissue grade) — पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात. उदा. निडारिया संघ.

पेशी-ऊती स्तर संघटन

  • ऊती-अवयव स्तर संघटन (Tissue-organ grade) — ऊती एकत्र येऊन अवयव तयार होतात, पण पूर्ण अवयवसंस्था नाही. उदा. चपटे कृमी.

ऊती-अवयव स्तर संघटन

  • अवयव संस्था स्तर संघटन (Organ-system grade) — अनेक अवयव एकत्र येऊन अवयवसंस्था तयार होते. उदा. मानव, बेडूक, खेकडा.

अवयव संस्था स्तर संघटन

आ. शारीरिक सममिती (Body Symmetry)

  • असममित शरीर (Asymmetrical) — कोणताही अक्ष नाही ज्यातून छेद घेतल्यास दोन समान भाग मिळतील. उदा. काही स्पंज.
  • अरिय सममिती (Radial symmetry) — मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास दोन समान भाग मिळतात. उदा. तारामासा (5 प्रतले).
  • द्विपार्श्व सममिती (Bilateral symmetry) — फक्त एकाच अक्षातून छेद घेतल्यास दोन समान भाग मिळतात. उदा. कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव.

शारीरिक सममितीचे प्रकार

इ. आद्यस्तर / जननस्तर (Germinal Layers)

  • द्विस्तरीय (Diploblastic) — फक्त बहिर्जनस्तर व अंतर्जनस्तर तयार होतात. उदा. सर्व निडारिया/सिलेंटरेटा.
  • त्रिस्तरीय (Triploblastic) — बहिर्जनस्तर व अंतर्जनस्तरासोबत मध्यस्तरही (Mesoderm) तयार होतो — बहुतांश सर्व प्राणी.

द्विस्तरीय व त्रिस्तरीय जननस्तर

ई. देहगुहा (Body Cavity / Coelom)

  • सत्य देहगुहा (Eucoelomate) — मध्यस्तरापासून तयार होणारी खरी देहगुहा. उदा. वलयी प्राणीसंघ व त्यापुढील सर्व संघ.
  • देहगुहाहीन (Acoelomate) — देहगुहा नसते. उदा. रंध्रीय, निडारिया, चपटे कृमी.
  • खोटी/फसवी देहगुहा (Pseudocoelomate) — देहगुहा असते पण योग्य पद्धतीने तयार झालेली नसते. उदा. गोलकृमी संघ.

देहगुहेवरून प्राण्यांचे प्रकार

उ. खंडीभवन (Body Segmentation)

  • शरीर छोट्या-छोट्या समान भागांत विभागलेले असल्यास त्याला खंडीभवित शरीर म्हणतात व प्रत्येक भागाला खंड (Segment) म्हणतात. उदा. वलयी प्राणीसंघातील गांडूळ.

वरील सर्व आधारभूत मुद्द्यांच्या आधारे प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण


4. प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण — असमपृष्ठरज्जू प्राणी (9 संघ)

1. रंध्रीय प्राणीसंघ (Phylum – Porifera)

  • सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना; यांना 'स्पंज' म्हणतात.
  • शरीरावर असंख्य छिद्रे (ऑस्टिया व ऑस्कुला) असतात — ऑस्टियामार्गे पाणी आत, ऑस्कुलामार्गे बाहेर.
  • बहुतांश जलवासी (समुद्री), काही गोड्या पाण्यात.
  • बहुतेकांचे शरीर असममित; विशिष्ट 'कॉलर पेशी' पाणी प्रवाहित करतात.
  • आधात्रीशी संलग्न असल्याने प्रचलन होत नाही — 'स्थानबद्ध प्राणी'.
  • शरीरास कंटिका/स्पाँजिन तंतूंचा आधार; प्रजनन मुकुलायन (अलैंगिक) किंवा लैंगिक पद्धतीने; उत्तम पुनरुद्भवन क्षमता.

उदाहरणे: सायकॉन, यूस्पाँजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, स्पाँजिला

2. सिलेंटराटा / निडारिया प्राणीसंघ (Phylum – Coelenterata/Cnidaria)

  • शरीर दंडाकृती (बहुशुंडक/Polyp) किंवा छत्रीच्या आकाराचे (छत्रिक/Medusa) असते.
  • बहुतेक समुद्रात, काही मोजके गोड्या पाण्यात आढळतात.
  • शरीर अरिय सममित व द्विस्तरीय असते.
  • मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके (Tentacles) — भक्ष पकडण्यासाठी व संरक्षणासाठी उपयोग.

उदाहरणे: जलव्याल (Hydra), सी-अ‍ॅनिमोन, पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर, जेलीफिश, प्रवाळ (Corals)

3. चपट्या कृमींचा संघ (Phylum – Platyhelminthes)

  • शरीर सडपातळ, पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे — म्हणून 'चपटेकृमी'.
  • बहुतेक प्राणी अंत:परजीवी (endoparasite); काही स्वतंत्र राहणारे व जलवासी.
  • शरीर देहगुहाहीन व द्विपार्श्व सममित; त्रिस्तरीय.
  • उभयलिंगी (Hermaphrodite) — एकाच प्राण्यात नर व मादी दोन्ही प्रजननसंस्था.

उदाहरणे: प्लॅनेरिया, लिव्हरफ्ल्युक, पट्टकृमी

4. गोलकृमी प्राणीसंघ (Phylum – Aschelminthes)

  • शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार — म्हणून 'गोलकृमी'.
  • स्वतंत्र राहणारे (जलवासी/भूचर) किंवा अंत:परजीवी असतात.
  • शरीर त्रिस्तरीय; आभासी (फसवी) देहगुहा असते.
  • शरीर अखंडित असून भक्कम उपचर्माने वेढलेले; प्राणी एकलिंगी असतात.

उदाहरणे: पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria), डोळ्यातील जंत (Loa loa)

5. वलयी प्राणीसंघ (Phylum – Annelida)

  • शरीर लांबट, दंडाकृती; कायखंड-खंडीभवन (Metameric segmentation) आढळते — 'खंडीभूत कृमी'.
  • बहुतेक स्वतंत्र राहणारे, काही बाह्यपरजीवी; समुद्री/गोड्या पाण्यातील किंवा भूचर.
  • त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममित व सत्य-देहगुहायुक्त.
  • प्रचलनासाठी दृढरोम (Setae), परापाद (Parapodia) किंवा चूषक; उभयलिंगी किंवा एकलिंगी.

उदाहरणे: गांडूळ, जळू, नेरीस

6. संधिपाद प्राणीसंघ (Phylum – Arthropoda)

  • छोट्या तुकड्यांनी जोडलेली सांधेयुक्त उपांगे — म्हणून 'संधिपाद'.
  • पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वांत जास्त — सर्वांत मोठा व यशस्वी प्राणीसंघ.
  • खोल महासागरापासून उंच पर्वतशिखरापर्यंत सर्व अधिवासांत आढळतात.
  • शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त, द्विपार्श्व सममित व खंडीभूत; शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल (Exoskeleton); एकलिंगी.

उदाहरणे: खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी

7. मृदुकाय प्राणीसंघ (Phylum – Mollusca)

  • शरीर मऊ, बुळबुळीत — म्हणून 'मृदुकाय'; प्राण्यांतील दुसरा सर्वांत मोठा संघ.
  • जलचर (बहुतांश समुद्री, काही गोड्या पाण्यातील) किंवा भूचर.
  • शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित व मृदू; डोके, पाय व आंतरांग संहती असे तीन भाग (गोगलगायीशिवाय द्विपार्श्व सममित).
  • आंतरांग संहती 'प्रावार' (Mantle) या पटलीने आच्छादलेली; प्रावार कठीण कॅल्शियम-कार्बोनेटयुक्त कवच स्रवते; एकलिंगी.

उदाहरणे: कालव, शिंपला (Bivalve), गोगलगाय, ऑक्टोपस

8. कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum – Echinodermata)

  • त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात — म्हणून 'कंटकचर्मी'.
  • सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात; शरीर त्रिस्तरी व देहगुहायुक्त.
  • प्रौढावस्थेत पंच-अरिय सममिती, तर अळी-अवस्थेत द्विपार्श्व सममिती असते.
  • नलिकापाद (Tube-feet) यांच्या साहाय्याने प्रचलन व अन्नग्रहण; उत्तम पुनरुद्भवन क्षमता; बहुतेक एकलिंगी.

उदाहरणे: तारा मासा, सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी-ककुंबर (समुद्रकाकडी)

9. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum – Hemichordata)

  • शरीर तीन प्रमुख भागांत विभागलेले असते — शुंड (Proboscis), गळपट्टी (Collar) व प्रकांड (Trunk).
  • फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो — म्हणून 'अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी'; यांना साधारणपणे 'ॲकॉर्नकृमी' म्हणतात.
  • सागरनिवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात.
  • श्वसनासाठी एक ते अनेक कल्लाविदरे (Pharyngeal gill slits) असतात; एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात.

उदाहरणे: बॅलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस

📌 परीक्षेसाठी महत्त्वाचे — बॅलॅनोग्लॉसस

उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील 'दुवा' (Connecting link) म्हणतात, कारण हा प्राणी दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे काही-काही गुणधर्म दाखवतो.


5. समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum – Chordata)

या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी एकाच संघात (Chordata) समाविष्ट केलेले आहेत. समपृष्ठरज्जू प्राणीसंघाची महत्त्वाची लक्षणे खालीलप्रमाणे:

  • विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरात पृष्ठरज्जू (Notochord) असतो.
  • विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी-कल्लाविदरे (Pharyngeal gill slits) असतात.
  • चेतारज्जू (Spinal cord) एकच, पृष्ठ बाजूस व नळीसारखा पोकळ असतो.
  • हृदय अधर बाजूस असते.

समपृष्ठरज्जू प्राणीसंघाचे तीन उपसंघांत वर्गीकरण केले आहे: युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा.

अ. उपसंघ – युरोकॉर्डेटा

  • पुच्छसमपृष्ठरज्जू प्राणी / कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी (Urochordata) — सागरनिवासी प्राणी.
  • शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले; अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असून फक्त शेपटीच्या भागातच पृष्ठरज्जू असतो.
  • सागरतळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांत होते; सामान्यत: उभयलिंगी.

उदाहरणे: हर्डमानिया, डोलिओलम, ऑइकोप्ल्युरा.

युरोकॉर्डेटा उपसंघातील प्राणी

आ. उपसंघ – सेफॅलोकॉर्डेटा

  • शीर्षसमपृष्ठरज्जू प्राणी (Cephalochordata) — लहान माशासारखे सागरनिवासी प्राणी.
  • पृष्ठरज्जू संपूर्ण शरीराच्या लांबीइतका; ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात; एकलिंगी.

उदाहरण: ॲम्फिऑक्सस.

सेफॅलोकॉर्डाटा उपसंघातील प्राणी : ॲम्फिऑक्सस

इ. उपसंघ – व्हर्टिब्रेटा (पृष्ठवंशीय प्राणी)

  • पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याजागी पाठीचा कणा तयार होतो; शीर (Head) पूर्णपणे विकसित व मेंदू कवटीत संरक्षित असतो.
  • अंत:कंकाल (Endoskeleton) कास्थिमय किंवा अस्थिमय असते.
  • काही पृष्ठवंशीय प्राणी जबडेविरहित (Agnatha), तर काहींना जबडे असतात (Gnathostomata).

व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे सहा वर्गांत वर्गीकरण केले आहे: चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व सस्तन.

1. चक्रमुखी प्राणीवर्ग (Class – Cyclostomata)

  • जबडेविरहित असे चूषीमुख असते; त्वचा मृदू व खवलेविरहित.
  • युग्मित उपांगे नसतात; अंत:कंकाल कास्थिमय; बहुतेक बाह्यपरजीवी.

उदाहरणे: पेट्रोमायझॉन, मिक्झीन

2. मत्स्य प्राणीवर्ग (Class – Pisces)

  • शीतरक्ती (Poikilothermic) जलचर प्राणी — समुद्री किंवा गोड्या पाण्यातील.
  • पाण्याचा प्रतिरोध कमी करण्यासाठी शरीर दोन्ही टोकांना निमुळते; पोहण्यासाठी युग्मित व अयुग्मित पर असतात.
  • बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरूपात; अंत:कंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय; श्वसन कल्ल्याद्वारे.

उदाहरणे: रोहू, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक-रे, स्टिंग-रे

3. उभयचर प्राणीवर्ग (Class – Amphibia)

  • डिंब-अवस्थेत फक्त पाण्यात राहून जलीय श्वसन, तर प्रौढावस्थेत पाणी व जमीन दोन्हीकडे राहून जलीय व वायू-श्वसन — म्हणून 'उभयचर'.
  • उपांगांच्या दोन जोड्या; अंगुलींना नखे नसतात; बाह्यकंकाल नसते व त्वचा ओलसर मृदू ठेवली जाते.
  • बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते; मान नसते; डोळे बटबटीत व पापण्यायुक्त.

उदाहरणे: बेडूक, टोड, सॅलॅमँडर

4. सरीसृप प्राणीवर्ग (Class – Reptilia)

  • प्राणी-उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी; शीतरक्ती.
  • शरीर उचलले जात नाही म्हणून जमिनीवर सरपटतात; त्वचा कोरडी व खवलेयुक्त.
  • शीर व धड यांच्यामध्ये मान असते; बाह्यकर्ण नसतो; अंगुलींना नखे असतात.

उदाहरणे: कासव, पाल, साप, सरडा, सुसर

5. पक्षीवर्ग (Class – Aves)

  • पूर्णपणे खेचर (उडणाऱ्या) जीवनासाठी अनुकूलित कशेरुस्तंभयुक्त प्राणी; उष्णरक्ती — शरीराचे तापमान स्थिर राखतात.
  • हवेतील प्रतिरोध कमी करण्यासाठी शरीर निमुळते; अग्रउपांगांचे पंखांत रूपांतर; अंगुली खवल्यांनी आच्छादित व नखेयुक्त.
  • बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात; मान असते; जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले.

उदाहरणे: मोर, पोपट, कबुतर, बदक, पेंग्विन

6. सस्तन प्राणीवर्ग (Class – Mammalia)

  • दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म; उष्णरक्ती (Homeothermic).
  • डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग; अंगुलींना नखे/नखर/खूर असतात.
  • बाह्यकंकाल केस किंवा लोकरीच्या (Fur) स्वरूपात.

उदाहरणे: मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ

📌 जरा डोके चालवा

1) सुसर, मगर यांसारखे प्राणी पाण्यात व जमिनीवरही राहतात — तरीही ते 'सरीसृप' वर्गात मोडतात, 'उभयचर' नव्हे; कारण त्यांची त्वचा कोरडी-खवलेयुक्त असते व डिंब-अवस्थेत ते जलीय श्वसनावर अवलंबून नसतात. 2) देवमासा (व्हेल) व वालरस हे पाण्यात राहणारे प्राणी असूनही त्यांना दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असल्याने ते 'सस्तनवर्गात' समाविष्ट केले जातात, 'मत्स्यवर्गात' नाही.


6. जलद उजळणीसाठी सारणी (Quick Revision Table)

असमपृष्ठरज्जू प्राणी (Non-chordates) — 9 संघ

क्र.संघ (Phylum)प्रमुख ओळख वैशिष्ट्यउदाहरण
1रंध्रीय (Porifera)शरीरावर असंख्य छिद्रे (ऑस्टिया/ऑस्कुला); कॉलर पेशी; असममित, स्थानबद्धसायकॉन, स्पाँजिला
2सिलेंटराटा/निडारिया (Cnidaria)दंशपेशीयुक्त शुंडके; अरिय सममिती; द्विस्तरीयजलव्याल (Hydra), जेलीफिश, प्रवाळ
3चपटे कृमी (Platyhelminthes)पानासारखे चपटे शरीर; देहगुहाहीन; उभयलिंगीप्लॅनेरिया, पट्टकृमी, लिव्हरफ्ल्युक
4गोलकृमी (Aschelminthes)दंडगोलाकार शरीर; आभासी(फसवी) देहगुहा; एकलिंगीपोटातील जंत (Ascaris), फायलेरिया जंत
5वलयी (Annelida)कायखंड-खंडीभवन; सत्य देहगुहा; दृढरोम/परापादगांडूळ, जळू, नेरीस
6संधिपाद (Arthropoda)सांधेयुक्त उपांगे; कायटिनयुक्त बाह्यकंकाल; सर्वांत मोठा संघखेकडा, कोळी, फुलपाखरू, मधमाशी
7मृदुकाय (Mollusca)मऊ शरीर; प्रावार (Mantle); कवच; दुसरा सर्वांत मोठा संघगोगलगाय, शिंपला, ऑक्टोपस
8कंटकचर्मी (Echinodermata)त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे; नलिकापाद; पंच-अरिय सममितीतारामासा, सी-अर्चिन, सी-ककुंबर
9अर्धसमपृष्ठरज्जू (Hemichordata)फक्त शुंडेमध्ये पृष्ठरज्जू; असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू यांतील दुवाबॅलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस

समपृष्ठरज्जू प्राणी (Chordata) — व्हर्टिब्रेटा उपसंघाचे 6 वर्ग

वर्ग (Class)प्रमुख वैशिष्ट्यउदाहरण
चक्रमुखी (Cyclostomata)जबडेविरहित चूषीमुख; खवलेविरहित त्वचा; बहुतांश बाह्यपरजीवीपेट्रोमायझॉन, मिक्झीन
मत्स्य (Pisces)शीतरक्ती; कल्ल्याद्वारे श्वसन; खवलेयुक्त बाह्यकंकाल; युग्मित व अयुग्मित पररोहू, शार्क, पापलेट
उभयचर (Amphibia)डिंब अवस्थेत जलीय, प्रौढावस्थेत उभयचर; ओलसर मृदू त्वचा; बाह्यकर्ण नाहीबेडूक, टोड, सॅलॅमँडर
सरीसृप (Reptilia)शीतरक्ती; कोरडी खवलेयुक्त त्वचा; पूर्ण भूचर सरपटणारेसाप, सरडा, कासव, सुसर
पक्षी (Aves)उष्णरक्ती; अग्रउपांगांचे पंखांत रूपांतर; पिसांचे बाह्यकंकाल; चोचमोर, पोपट, कबुतर
सस्तन (Mammalia)उष्णरक्ती; दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी; केस/लोकर युक्त त्वचामानव, कांगारू, वटवाघूळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या