महाराष्ट्रातील हवामान

 महाराष्ट्रातील हवामान 

            एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळेला वातावरणाची जी स्थिती असते तिला हवा म्हणतात. एखाद्या ठिकाणच्या दीर्घ काळातील हवेच्या स्थितीला हवामान म्हणतात.

            महाराष्ट्र उष्ण कटिबंधीय हवामान विभागात येते.महाराष्ट्रातील पश्चिमेकडील कोकण किनारपट्टीवर सम प्रकारचे हवामान आढळते तर महाराष्ट्र पठारावर विषम प्रकारचे हवामान आढळते. महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे त्यामुळे पश्चिम भागात हवेत आर्द्रता अधिक असते तर पूर्वेकडील हवा कोरडी असते.

महाराष्ट्रातील मुख्य ऋतू 

१. उन्हाळा 

            मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात उन्हाळ असतो. महाराष्ट्राचे स्थान उत्तर गोलार्धात असल्यामुळे महाराष्ट्रातही २१ मार्च नंतर उन्हाळा सुरु होतो.  उन्हाळ्यात उच्च तापमान व कोरडी हवा असते तर उन्हाळ्यात सरासरी तापमान ३४° ते ३८° असते.

कोकणाला समुद्रकिनारा लाभल्यामुळे दिवसा वाहणारे खारे वारे आणि रात्री वाहणारे मतलई वारे यामुळे कोकण किनारपट्टीवर तापमान कमी असते. या दिवसात सरासरी ३३° उच्चतम तापमान असते.

कोकणाकडून पूर्वेकडे जाताना पठारावर तापमान कक्षा वाढत जाते. पश्चिम पठारावरील भागात उन्हाळ्यात  सरासरी तापमान ३५° तर ४०° असते तर पूर्व पठारावर ४० ° तर ४५°तापमान असते. उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान विदर्भात असते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे महाराष्ट्र पठारावर आर्द्रता १०% ते २०% असते तर कोकण किनारपट्टीवर आर्द्रता ५०% असते.

२.पावसाळा :


        दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून नैऋत्य दिशेकडून वारे वाहत येतात त्यांना नैऋत्य मौसमी वारे म्हणतात. हे वारे कोकण किनाऱ्यावर दाट काळे ढग वाहून आणतात. नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी कोकण किनारपट्टीवर प्रवेश केल्यावर या वाऱ्यांना सह्याद्री पर्वत प्रतिरोध करतो त्यामुळे हवेचे तरंग वरच्या दिशेने चढत जातात. हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे रूपांतर ढगांमध्ये होते आणि कोकण किनार पट्टीवर पाऊस पडतो. 

        सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर जोरदार पाऊस पडतो. किनाऱ्यापासून जसेजसे सह्याद्रीकडे जावे तसेतसे पावसाचे प्रमाण वाढत जाते. सर्वात जास्त पाऊस घाटमाथ्यावर पडतो. महाबळेश्वर, आंबोली हि स्थळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत. या अतिउंच ठिकाणी जून ते सप्टेंबर या काळात ७४७ सें.मी.इतका कमाल पाऊस पडतो 

           वाऱ्याबरोबर आलेल्या ढगांनी सह्याद्री ओलांडला कि पूर्वेकडील उतारावरून त्यांना उतरावे लागते नंतर ते महाराष्ट्राच्या सखल पठारावरून वाहू लागतात. पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होते. डोंगराळ भागात ५०० सें.मी. पाऊस  तर महाराष्ट्र पठाराच्या अहमदनगर व सोलापूर या पूर्व भागात केवळ ५० सें.मी. पाऊस पडतो. या भागाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण पुन्हा हळूहळू वाढते. मराठवाडा भागात सुमारे ६० ते १०० सें.मी. पाऊस पडतो. विदर्भाच्या पूर्व भागातील चंद्रपूर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सुमारे १५० सें.मी.  पर्यंत वाढते. या भागात अरबी समुद्र वरून येणाऱ्या वार्यांप्रमाणेच बंगालच्या उपसागरावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यांपासून हि काही प्रमाणात पाऊस मिळतो.



३.हिवाळा 

             ऑक्टोबर ते फेब्रुवारी महाराष्ट्रामध्ये हिवाळा असतो. महाराष्ट्र उष्ण कटिबंधात येत असल्यामुळे कडाक्याची थंडी पडत नाही.हिवाळ्यात महाराष्ट्रात दिवसाचे सरासरी तापमान ३०° असते तर रात्रीचे सरासरी तापमान १५° असते. कोकण किनारपट्टीत खारे वारे आणि मतलई वारे यामुळे तापमान सम असते त्यातुलनेत राज्याच्या अंतर्गत भागात तापमान कमी असते. 













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या