📘 म्हणी व त्यांचे अर्थ
खालील मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व्यवहारज्ञान, जीवनशिकवण आणि अनुभवांचे सार सांगतात. या म्हणी शिक्षण, स्पर्धा परीक्षा व नैतिक शिक्षणासाठी उपयोगी ठरतात.
🗣️ म्हणी म्हणजे काय?
म्हण म्हणजे विशिष्ट पद्धतीचे बोलणे. म्हणीच्या माध्यमातून एका पूर्ण विधानात बोलणाऱ्याच्या मनातील अनुभव, विचार आणि ज्ञान प्रकट होते.
म्हण म्हणजे लहान पण प्रभावी वाक्य, जे अनुभव, नीती आणि जीवनातील सत्य स्पष्ट करते.या म्हणी लोकांच्या संचित ज्ञानाचा खजिना आहेत आणि पिढ्यानपिढ्या आपल्याकडे पोहोचल्या आहेत. म्हणी व वाक्प्रचार भाषा अधिक प्रभावी व जिवंत करतात.
सामान्यतः प्रत्येक म्हणीच्या मागे एक कथेसारखी पार्श्वभूमी असते आणि ती म्हण त्या कथेचा निष्कर्ष असते.
✅ उदाहरण: “अति तेथे माती” – अतिरेक केल्याने नुकसान होते, हे शिकवणारी म्हण.
अ
- अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो.
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो.
- अडला हरी (नारायण) गाढवाचे पाय धरी – अडचणीत बुध्दिमानालाही मूर्खांची मदत घ्यावी लागते.
- अति रागा भीक मागा – रागामुळे माणूस आपल्या दुःखाचे कारण बनतो.
- अंथरूण पाहून पाय पसरावे – ऐपतीनुसार खर्च करावा.
- असतील शिते तर जमतील भूते – फायदा दिसल्यास लोक आपोआप जवळ येतात.
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – वाईट संगत जिवावर बेतू शकते.
- अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे – मोफत मदतीवर समाधान न मानता अधिक मागणे.
- अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – मरणाआधीचे कष्ट अधिक दुःखदायक असतात.
- अती खाणे मसणात जाणे – अति खाण्याचे शेवट वाईट होतो.
- अन्नाचा मारलेला खाली पाही, तलवारीचा मारलेला वर पाही – सौम्यता व्यक्ती बदलू शकते.
- असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा – परिस्थितीनुसार माणसाचे वागणे बदलते.
- अर्धी टाकून सगळीला धावू नये – जे आहे त्याला सोडून, सगळे मिळवू पाहू नये.
- अर्थी दान महापुण्य – गरजूला वेळेवर मदत केल्याने पुण्य मिळते.
- अर्ध्या वचनात असणे – पुढचे ऐकण्यासाठी आतुर होणे.
- अडली गाय फटके खाय – संकटात असलेल्या व्यक्तीला त्रास होतोच.
- अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
- अंगापेक्षा बोंगा जड, कुठे चालला सोंगा? – प्रत्यक्ष पेक्षा दिखावा मोठा.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे – थोडक्याच यशावर गर्व करणे.
- अस्मान ठेंगणे होणे – गर्वाचा कळस गाठणे.
- अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया – स्वतः स्वतःचे ही संरक्षण करू न शकणे.
- आपला हात जगन्नाथ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
- अभ्यासाचे दप्तर जड – कामापेक्षा दगदग जास्त.
- अति झाले आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की दुःखदायी ठरते.
- अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.
- अंधारात केले, पण उजेडात आले - कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे – कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच.
- अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास – अन्न न खाणे; पण त्यात मन असणे.
- अळी मिळी गुप चिळी – रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
- अहो रूपम अहो ध्वनी – एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
- अचाट खाणे मसणात जाणे – खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
- अपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
- अल्प बुद्धी बहू गर्दी – कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो.
- अटकाव नाही तेथे धुडगूस – जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो.
- अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये – अपरिचित माणसाशी सलगी करू नये.
- अंधारात चोरास बळ – अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढते.
- अघळपघळ अन् घाल गोंधळ – मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते.
आ
- आधी पोटोबा मग विठोबा – आधी पोटपूजा मग देवपूजा, म्हणजेच आधी स्वार्थ मग परमार्थ.
- आपलेच दात, आपलेच ओठ – आपल्याच माणसांनी निर्माण केलेली अडचण.
- आकारे रंगती चेष्टा – बाह्य स्वरूपावरून व्यक्तीची कृती ओळखली जाते.
- आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी – जेव्हा सुबुद्धी जाते, तेव्हा संपत्तीही नष्ट होते.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.
- आडात नाही तर पोह-यात कोठून येणार? – मूळ स्रोतच नसेल, तर बाकी काही मिळणारच नाही.
- आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वतःचे दोष कळत नाहीत.
- आपला हात जगन्नाथ – आपल्या हातातीलच सर्व नियंत्रण आहे.
- आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडलेले स्थित्यंतर.
- आजा मेला, नातू झाला – घरात एक माणूस गेला, दुसरा आला; एकूण स्थिती तशीच.
- आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते – अशक्य गोष्टींवर चर्चा व्यर्थ आहे.
- आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन – दुसऱ्याला त्रास द्यायच्या प्रयत्नात स्वतःचाच नाश करणे.
- आयत्या बिळात नागोबा – दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचा फायदा करून घेणे.
- आईजीच्या जिवावर बाईजी उदार – दुसऱ्याच्या पैशावर स्वतः दानशूरपणा दाखवणे.
- आपापाचा माल गपापा – मेहनत न करता मिळालेल्या गोष्टी निष्काळजीपणे खर्च करणे.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – आधीच हौस त्यात अजून उत्साहाची भर.
- आंधळे दळते कुत्रे पीठ खाते – मेहनत दुसऱ्याची, फायदा तिसऱ्याचा.
- आधणातले रडतात, सुपातले हसतात – दु:खात हसणारेच पुढे त्या दु:खाला भोगतात.
- आपल्या कानी सात बाळ्या – एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे.
- आपण हसे लोका, शेंबूड आपल्या नाका – दुसऱ्याचे दोष हसणारे स्वतः दोषी असणे.
- आले अंगावर, घेतले शिंगावर – संधीचा फायदा घेत त्वरित कृती करणे.
- आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटे – स्वतःबाबतीत सहानुभूती, पण दुसऱ्याबाबतीत टिका.
- आंधळ्या बहिच्याशी गाठ – दोघांनाही मदत करता येत नाही, तरी एकत्र येणे.
- आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच हौस आणि त्यात दुसऱ्याचे चिथावणी.
- आगीतून निघून फोपाट्यात पडणे – एक संकट टळत नाही, दुसरे सुरू होते.
- आठ पुरभय्ये नऊ चौके – जिथे सर्वांचे मतभेद असतात तिथे एकमत शक्य नसते.
- आभाळास ठिगळ कोठवर लावणार? – परिस्थिती इतकी बिकट की उपाय अपुरे पडतात.
- आकाशपाताळ एक करणे – अतिशय गोंधळ उडवणे.
- आठ हात लाकूड व नऊ हात धलपी – अशक्य आणि अतिशयोक्तीपूर्ण गोष्ट सांगणे.
- आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी – अडचणीच्या मधे थोडा हुशार वाटतो.
- आप करे सो काम, पदरी होय सो दाम – आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.
- आपल्या पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणे.
- आवळा देऊन कोहळा काढणे – थोडे देऊन जास्त काही मिळवण्याचा प्रयत्न.
- आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे – दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचे नाव लावणे.
- आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच भरकट्यात त्यात मद्य प्यायलेला.
- आंधळ्या बहिच्याशी गाठ – दोघांनाही मदत करता येत नाही, तरी एकत्र येणे.
- आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच हौस आणि त्यात दुसऱ्याचे चिथावणी.
- आसू ना मासू कुत्र्याची सासू – जिथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही.
- आडातला बेडूक समुद्राची गोष्ट सांगे – संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
- आप सुखी तर जग सुखी – आपण आनंदात असलो की सारे जग आनंदात आहे असे वाटते.
- आयत्या पिठावर रांगोळी – दुसऱ्याच्या परिश्रमा वर फायदा घेणे.
- आपले नाही धड नाही शेजाऱ्यांचा कढ – कोणाविषयी प्रेम नसणे.
- आपले नाक कापून दुसऱ्याचा अपशकुन – आपले नुकसान करायचे पण दुसऱ्याचे पण करायचे.
- आपण शेन खायच नि दुसऱ्याच तोंड हुंगावायच – आपले दोष दुसऱ्यावर लादायचे प्रयत्न करणे.
- आले अंगावर तर घेतले शिंगावर –आयता मिळालेला फायदा करून घेणे.
- आईजीच्या जीवावर बाईजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
- आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
- आधी शिदोरी मग जेजूरी – आधी भोजन मग देवपूजा.
- आचार भ्रष्टी सदा कष्टी – ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दुःखी असतो.
- आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
- आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते – अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
- आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण.
- आलीया भोगाशी असावे सादर –कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
- आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
- आईचा काळ बायकोचा मवाळ – आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा.
- आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली – अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
- आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे.
- आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही – अनुभवाशिवाय शहाणपण नसते.
- आधीच तारे, त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
इ
- इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणीत सापडणे.
- इकडचा डोंगर तिकडे करणे – काहीतरी प्रचंड उद्योग करणे.
- इळा (विळा) मोडून खिळा करणे – अधिक किमतीची वस्तू थोड्याशा लाभाकरिता हातची घालवून देणे.
- इच्छा तेथे मार्ग – एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
- इच्छा परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
- इन मीन साडेतीन – एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
- इच्छा तसे फळ – जशी इच्छा असते तसे फळ मिळते.
- ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेण बांधतो – जन्मास आलेल्यांचे पालनपोषण होतेच.
उ
- उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही - दुस-यांचे नुकसान होत असतानाही त्याचा प्रतिकार न करता स्वस्थ बसणे माणसाच्या हातून होत नाही.
- उचलली जीभ लावली टाळ्याला - बोलणे सोपे असते, पण करणे कठीण, शक्याशक्यतेचा विचार न करता बोलणे.
- उपट सूळ घे खांद्यावर - नसती कटकट मागे लावून घेणे.
- उथळ पाण्याला खळखळाट फार - ज्ञान थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त अस्तो.
- उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - अतिशय उतावळेपणामुळे मुर्खासारखे वागणे.
- उंदराला मांजर साक्ष - हिताचे संबंध असलेले दोघेही एकमेकांचे साक्षीदार असण्याची परिस्थिती.
- उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो ? - येईल त्या संकटाला तोंड देण्याची तयारी असल्यावर कशाला कोण घाबरणार?
- उचल पत्रावळी म्हणे जेवणार किती ! - हाती घेतलेले काम सोडून भलत्याच गोष्टींची उठाठेव करणे.
- उंटावरून शेळ्या हाकणे - अतिशय आळस व निष्काळजीपणा करणे.
- उठता लाथ बसता बुक्की - प्रत्येक कामात एक सारखी शिक्षा करीत राहणे.
- उधारीचे पोते सव्वा हात रिते - उधार माल घेतल्याने नुकसान जास्त.
- उडत्या पाखराची पिसे मोजणारा - अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
- उंबर फोडून कंबरे काढणे - लहानशा कामाचा अभिमान धरून मोठ्या कामाचा विध्वंस करणे.
- उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी - प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमते नुसार काम करतो.
- उसाच्या पोटी कापूस- सगुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.
- उतावळी बावरी (नवरी) म्हाताऱ्याची नवरी - अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
- उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी- जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
- उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक - एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
- उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे- श्रीमंत माणसाची खुशामत करणारे गोळा होत असतात.
ऊ
- ऊन पाण्याने घरे जळत नसतात - एखाद्या सभ्य गृहस्थावर खोटे आरोप केल्याने त्याची बेआबू होत नाही.
- ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये - चांगल्या गोष्टीचा कधीही गैर फायदा घेऊ नये.
- ऊस गोड पण मुळ्या सोड - परोपकारी माणसाला फार छळू नये.
ए
- एकाने गाय मारली म्हणून दुस-याने वासरू मारू नये -एकाने एक मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुस-याने लहानशी का होईना ती वाईट गोष्ट करू नये. दोघे ही दोषीच.
- एका हाताने टाळी वाजत नाही - घडणा-या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.
- एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत - एकाच धंद्याची माणसे एकमेकांचा मत्सर केल्याशिवाय राहात नाहीत.
- ऐकावे जनाचे, करावे मनाचे - लोकांचे मत समजून घ्यावे. पण आपल्याला योग्य वाटेल ते करावे.
- एक पंथ दो काज - एकाच वाटेवरची दोन कामे एका खेपेत करणेच योग्य.
- एक घाव दोन तुकडे - पटकन निकाल लावणे.
- एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एक ही काम धड होत नाही. सगळेच अपूर्ण राहते.
- एका माळेचे मणी - सगळे सारखेच.
- एका कानाने ऐकावे व दुस-या कानाने सोडून द्यावे -एखादी गोष्ट दुस-यांची ऐकावी पण ती मनावर घेऊनये किंवा तसे वर्तन ही करायला जाऊ नये.
- एकदा कानफाट्या नाव पडले की पडले - लोकांमध्ये एखाद्याचे नाव वाईट झाले तर ते सुधारणे कठीण (अशक्य) असते.
- एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी -दूसरा संकटात सापडला असता त्याला मदत करायची सोडून थोडासा का होईना स्वत:चा फायदा होत असल्यास तो करून घेणे.
- एका पायावर तयार (सिद्ध) असणे - तत्पर असणे, फार उत्कंठित होणे.
- एक से भले दो -एकापेक्षा दोघे बरे.
- एक नाही दोन नाही - पूर्ण शांतता.
- एकटा जीव सदाशिव -एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते तो चैनीत दिवस घालवतो.
- एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात - दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणारा.
- एक भाकरी सोळा नारी - एका जागेसाठी अनेकांचा दावा.
- एकादशीच्या दिवशी शिवरात्र येणे -संकटात आणखी संकटे येणे.
- एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत - दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
- एकाने गाव मारली म्हणून दुसन्याने वासरु मारु नये -दुस-याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
- ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार - मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.
ओ
- ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ज्याला मर्म माहीत असते, तो घात करू शकतो.
- ओ म्हणता ठो येईना - अक्षरशत्रू असणे.
- ओठात एक आणि पोटात एक - मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे.
- ओठातून की पोटातून - वरवर की मनापासून.
- ओले जळते आणि वाळलेही जळते - वाईटाबरोबर कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते.
- ओटी तेच पोटी - बोलावे तसे वागावे.
- औषधावाचून खोकला गेला - काही न करता विघ्न टळले.
क
- कर नाही त्याला डर कशाला ? - ज्याने वाईट काम केले नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही.
- कसायाला गाय धारजिणी (धार्जिण) - कठोर व दुष्ट धन्याशी नोकर गरिबीने वागतात, पण गरीब धन्याची मात्र हेळसांड करतात.
- कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच - ज्याचा स्वभाव जन्मतः वाईट असल्यास तो सुधारणे कठीण.
- करील ती पूर्वदिशा - एखादा माणूस जे काही सांगतो, ते इतरानी निमूटपणे ऐकून घेणे.
- करावे तसे भरावे - केलेल्या दुष्कृत्यास त्याप्रमाणात शिक्षा भोगण्यास तयार असावे.
- करील ते कारण आणि बांधील ते तोरण - एखादा माणूस जे सांगतो किंवा करतो तेच खरे मानणे.
- कवडी कवडी माया जोडी - काटकसरीने पैसा जमविणे.
- कंरगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय ? -प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतेच की नाही ?
- कामापुरता मामा व ताकापुरती आजीबाई - काम होई पर्यंतच गोड गोड बोलणे.
- काळ आला होता, पण वेळ आली नव्हती - नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात संकट टळले.
- काखेत कळसा, गावाला वळसा - जवळ असलेल्या वस्तूचा भान नसल्याकारणाने दूरवर जाऊन शोध घेणे.
- काप गेले आणि भोके रहिली - कीर्ती आणि वैभव गेले तरी त्याचा पोकळ अभिमान मात्र शिल्लक राहतो. (काप - कानातला दागिना)
- कानामागून आली आणि तिखट झाली - मागून येऊन सुद्धा थोड्याच दिवसात वरचढ होणे.
- कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर - ऐकलेली गोष्ट व पाहिलेली गोष्ट यात जमीन आस्मानाचा फरक असू शकतो.
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - वाईट माणसांच्या शापाने चांगल्या माणसांचे काही नुकसान होत नाही.
- काडी चोर तो माडी चोर - लहान सहान अपराध करणा-या माणसाची मोठा अपराध करायचीही प्रवृत्ती होते.
- काही सोन्याचा गुण, काही सवागीचा गुण - एखादे मोठे कार्य करीत असता जसे मोठ्या लोकांचे सहाय्य होते तसेच क्षुद्र लोकांचे ही सहाय्य होऊ शकते.
- काट्याचा नायटा (होतो) - एखादी क्षुल्लक गोष्ट म्हणून दुर्लक्ष करू नये ती विकोपाला जाऊन भयंकर परिणाम होऊ शकतात.
- काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीत -थोड्याशा अधिकाराने जे काम होते ते खूपशा पैशाने देखील होऊ शकत नाही.
- काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही - खरी मैत्री क्षुल्लक कारणाने तुटत नाही.
- काळ्यापेक्षा पिठा दगड बरा - दोन्ही वस्तू पैकी एक वस्तू अधिक चांगली. (दगडापेक्षा वीट मऊ)
- कुडी तशी पुडी - जसे शरीर तसा आहार.
- कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच (कुत्र्याचे शेपूट वाकडे) - जातीस्वभाव वाईट असला तर त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होत नाही.
- कुडास कान, ठेवी ध्यान (भिंतीलाही कान असतात) -भिंतीच्या आडूनही कोणी ऐकण्याची शक्यता आहे म्हणून सावधगिरीने बोलावे.
- कुचेष्टे वाचून प्रतिष्ठा नाही - जगात प्रतिष्ठा मिळवायची असेल तर वाईट ऐकण्याचीही तयारी हवी, त्रास सोसल्या शिवाय मोठपणा मिळत नाही.
- कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलीच माणसे आपल्या नाशास कारणीभूत होतात.
- कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे- ज्याच्या हाती एखाद्या गोष्टीचे रक्षण करण्याचे काम दिले तर त्यानेच त्याचे रक्षण करण्याचे सोडून नुकसान करणे.
- कुसंतानापेक्षा निसंतान बरे - कुपुत्र असण्यापेक्षा मुळीच संतान नसलेले अधिक बरे.
- केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी - अत्यंत दरिद्री अवस्था.
- कोरड्या बरोबर ओले ही जळते - वाईट माणसांच्या संगतीत चांगला माणूस असला तर वाईटाच्या नाशाबरोबर त्याचाही नाश होतो.
- कोंड्याचा मांडा करून खाणे - जे आपल्याला मिळते त्यात सुखासमाधानाने रहावे.
- कोळसा उगाळावा तितका काळाच (कोळसा किती जरी उगाळला तरी तो काळा तो काळाच) - वाईट गोष्ट नेहमी वाईटच असायची, त्यात सुधारणा अशक्य.
- कोरडी आग पुरवते, ओली आग पुरवणार नाही - विस्तवाने लागलेली आग बुजविता येते, पण भुकेची आग बुजविता येत नाही.
- कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम भट्टाची तट्टानी - एक अतिशय थोर व श्रीमंत, दुसरा अतिशय गरीब व क्षुद्र यांची जोडी जमणे अशक्य.
- कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तू मिळाली तरी तेवढ्यावरच खुष होतात.
- कोठे राजा भोज आणि कोठे गंगा तेलीण - चांगल्या वस्तू बरोबर क्षुद्र वस्तूची बरोबरी करणे अयोग्य.
- कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटावयाचे रहात नाही - जी गोष्ट व्हावयाचीच आहे त्याच्यावर कोणत्याही अडथळ्याचा परिणाम होत नाही.
- कोल्ह्यांना द्राक्षे आंबट - जी गोष्ट अशक्य आहे, त्याची निंदा करणे.
- कोणाची होऊ नये बायको, आणि कोणाचे होऊ नये चाकर - दुस-यांच्या तंत्राने चालणा-यांना स्वतंत्रता नसतेच.
- कोणाचा पायपोस कोणाचे पायात नसणे - मोठा गोंधळ निर्माण होणे.
- कानाला वडा लावून घेणे - एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून स्वतःलाच शिक्षा करून घेणे.
- कानावर हात ठेवणे - आपल्याला काहीच माहीत नाही असा भाव व्यक्त करणे.
- करुन करुन भागला, देवध्यानी लागला - भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.
- कधी तुपाशी तर कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.
- कशात काय अन फाटक्यात पाय - वाईटात आणखी वाईट घडणे.
- कावळा बसायला अन फांदी तुटायला - परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
- कानात बुगडी, गावात फुगडी - आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
- काळ्या दगडावरची रेघ - न बदलणारी गोष्ट.
- कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
- केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले - एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
- कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी - चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.
- काने कोपरे विसरू नका पायली पसा भुलू नका - शेताचा काना कोपर कोपरा पेरला गेला पाहिजे नाहीतर पीक कमी येते.
- काकडीची चोरी फाशीची शिक्षा - लहान अपराधाला मोठी शिक्षा.
- कुळास कान ठेवी ध्यान- भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्यात म्हणजे बाहेर फुटतात.
- कंबरेचे सोडलं डोक्याला बांधलं - लाज लज्जा पार सोडून देणे.
- कालच्या वाणी भलभल पाणी - सारखे दिवस सारखे असणे.
- काम नाही कवडीच फुरसत नाही घडीची - काम करीत असणे पण ते दिसत नाही.
- कोंबड्यापुढे मोती - मूर्खापुढे पैशाचा ढीग.
- कानाला उणका व नाकाला औषध - रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे.
- केर डोळ्यात फुंकर कानात - भलत्या जागी भलताच उपाय.
- काल मेला आणि आज पितर झाला - हातात थोडासा अधिकार येताच सत्ता गाजविणे.
- काशीस जावे नित्य वदावे - चांगल्या गोष्टींचा नेहमी संकल्प करावा.
- केळ्याचा लोंगर देई पैशाचा डोंगर - केळीचे पीक भरपूर पैसा देते.
- कोंबडी लावगारली, म्हैस आवाळली - शूद्र वस्तूसाठी किमती वस्तूचा नाश होणे.
- कोळशाच्या दलालीत हात काळे - वाईट कृत्याचा परिणाम वाईट असतो.
- कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी - सर्वांचेच दिवस येतात समान स्थिती कधीच राहत नाही.
ख
- खर्चनाऱ्याचे वर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते - दुष्ट माणसे स्वतःहून दानधर्म किंवा परोपकार करीत नाहीत पण उदार माणसानी काही चांगले करायला गेल्यास त्यांच्या कामात अडथळा आणतात.
- खर्याला मरण नाही - खरी गोष्ट कधीही कोणीही लपवू शकत नाही. ती कधीतरी उघडकीस येणारच.
- खाण तशी माती - बीजाप्रमाणे अंकुर असतो, तसेच आई वडिलाप्रमाणे त्यांची मुले असतात.
- खाई त्याला खवखवे - जो कोणी अपराध करतो त्याला त्याची सारखी जाणीव होत असते व तो अस्वस्थ होतो.
- खाजवून अवधान आणणे - आपल्याच हाताने आपल्या जिवाला त्रास करून घेणे.
- खायला काळ भुईला भार - अत्यंत निरुपयोगी मनुष्य कोणालाही नको असतो.
- खाऊ जाणे तो पचवू जाणे - जो कोणी वाईट कृत्य करण्यास तयार असतो तो त्याचा परिणामही भोगावयास सिद्ध असतो किंवा जो चांगले काम करण्यास हाती घेतो, तो शेवटही करतो.
- खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी - एखाद्या गोष्टीबद्दल आग्रह धरणे.
- खाजवून स्वरूज काढणे - मिटलेली भांडणे पुन्हा उकरून काढणे.
- खाऊन माजावे, टाकून माजू नये - अन्न खाल्ले तर शरीराच्या वाढीला उपयोग होतो. पण तेच अन्न टाकले तर त्याचा नाश होतो. सत्कार्य करताना त्याचा दुरूपयोग करू नये.
- खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला -थोड्याशा निष्काळणीपणामुळे भयंकर अनर्थ होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीनेही मोठे नुकसान होऊ शकते.
- खोट्याच्या कपाळी गोटा किंवा कुन्हाडीचा घाव - जो मनुष्य वाईट काम करतो त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो.
- खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे - मनात एक बाहेर दुसरेच रूप. (दुटप्पीपणाने वागणे.)
- खाल्ल्या घरचे वासे मोजणे - ज्याच्यावर आपण उपकार करतो, त्याने आपल्याबद्दल वाईट चिंतणे, निमकहराम होणे.
- खाई त्याला खवखवे - जो वाईट काम करतों त्याला मनात धास्ती वाटते.
- खतावीण शेती करी सोन्याची माती - शेतात खत घातले नाही तर पीक चांगले येत नाही.
- खिशात नाही कवडी बदलली कोंबडी - आपली कुवत नसताना व्यवहार करणे.
- खुट्याची सोडली आणि झाडाला बांधली - कुठेही शेवटी बंधनात असणे.
- खाता दोन आन्याच अंगात सतरा आन्याच- केवढ्या बढ़ाया मारणे.
- खत कसदार तर पीक भरदार - चांगले खत पातले तर पीक चांगले येते.
- खरा मोती गागऱ्यात लपला - खऱ्याची पारख नसणे.
ग
- गरजवंताला अक्कल नसते - एखाद्या संकटात सापडलेल्या गरजवंताला दुस-यांचे वाईट बोलणेही ऐकून घ्यावे लागते.
- गरज सरो वैद्य मरो - गरज असे पर्यंतच एखाद्याची आठवण ठेवणे, गरज संपली की त्याला विसरणे.
- गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार - आई वडिलांचे गुण नेहमी मुलांना येतात. (अनुवंशिक संस्कार त्याच्यावर होतात)
- गर्जेल तो पडेल काय? (गर्जेल तो वर्षेल काय?) - केवळ बडबड करणा-या माणसाच्या हातून कोणतेही कार्य होऊ शकेल का?
- गर्वाचे घर खाली - गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईटच होतो.
- गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ - मुर्ख माणसे एकत्र जमली की त्यांच्या हातून वाईट कृत्ये होण्याचीच शक्यता जास्त असते.
- गाढवाने शेत खाल्ल्याचे ना पाप ना पुण्य - दुर्जनावर उपकार केल्याने काही उपयोग होत नाही. आपलेच श्रम व्यर्थ जातात.
- गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली - एखादे चांगले काम हाती घेतले तर त्याचा फायदाच होईल, तोटा नाहीच.
- गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता - मूर्ख माणसाचे गोंधळ घालण्यात जितके मन रमते तितके चांगल्या गोष्टी ऐकण्यात किंवा करण्यात रमत नाही.
- गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी - एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही, त्याचा फायदा करून घेण्याचे सामर्थ्य असावे लागते.
- गाढवाला गुळाची चव काय माहीत ? - मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.
- गाव करी ते राव न करी - एकजुटीने महान कार्य करता येते, ते पैशांनी ही होणार नाही. (एकीची महती.)
- गाड्यावर नाव, नावेवर गाडा - सर्व दिवस सारखे नसतात. गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो व श्रीमंताचा गरीब.
- गाड्याबरोबर नळ्याला यात्रा - मोठ्यांच्या आश्रयामुळे लहानांचाही अनायासे लाभ होतो.
- गांवढ्या गावात गाढवी सवाष्ण - लहान गावात क्षुद्र माणसालाही महत्व प्राप्त होते. चांगल्या वस्तू नसल्यास टाकवू असल्या तरी चालतात.
- गाठचा एक बाहेरच्या शंभराबरोबर - जे पूर्णपणे आपल्या ताब्यात आहे ते थोडेसे असले तरी त्याची योग्यता अधिक असते.
- गुळावरल्या माशा किंवा सास्वरेवरले मुंगळे - जोपर्यंत एखाद्याचे उत्कर्षाचे दिवस असतात तो पर्यंतच त्याच्याभोवती मित्र जमतात.
- गुरूची विद्या गुरूलाच - दुस-यांना फसविण्याचा प्रयत्न केल्यास स्वतः फसल्या शिवाय राहात नाही.
- गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबाला पैशाची मदत करणे अशक्य असले तरी गोड बोलणे शक्य असावे.
- गोगलगाय आणि पोटात पाय - दिसायला गरीब पण असतो कपटी. आत एक आणि बाहेर दुसरेच.
- गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य - दोघे दिसायला भिन्न असले तरी वस्तुतः एकच असतात.
- गोरागोमटा कपाळ करंटा - दिसण्यात सुंदर पण नशीब वाईट.
- गची बाधा झाली - गर्व चढणे.
- गरिबी हरिबी काही हातची नाही - काळ काही आपल्या हातचा नाही.
- गरिबांनं खपावं धनिकानं खावं - गरिबांने कष्टा करावे आणि श्रीमंतान माल खावा.
- गोफन गेली तिकडे, गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे.
- गरिबाच्या दाराला सवकाराची कडी -गरीबां वर सवकाराचा अंमल.
- गवत्या बसला जेवया आणि ताकासंगे शेवया- अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा उपयोग करू शकत नाही.
- गळी नाही सरी, सुखी निद्रा करी - ज्या स्त्रीच्या अंगावर दागिने नसतात तिला सुखाने झोप लागते.
- गळ्यातले तुटले ओटीत पडले - कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ ठेवणे.
घ
- घरोघरी मातीच्या चुली - सामान्यपणे प्रत्येकाच्या घरी सारखीच परिस्थिती असते.
- घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - कुटुंबातील प्रमुख पुरूषावर संकट ओढवले तर त्याच्या आश्रितांचा सुद्धा त्याला साथ मिळू शकत नाही.
- घघाची विद्या येते पर ददाची विद्या येत नाही - घेणे माहीत आहे पण देणे नाही.
- घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे - मनुष्याला स्वतःच्याच कामाचा व्याप अतोनात असताना दुस-यानी आपलेही काम त्याच्यावर लादणे.
- घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते - वेगवेगळ्या माणसांना आपापल्या कर्मानुसार सुखदुःखाचे अनुभव घ्यावे लागतात.
- घर बांधून पहावे आणि लग्न करून पहावे (घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून) - घर बांधताना किंवा लग्न करताना कोणकोणती संकटे येतील व खर्च किती होईल हे काही सांगता येत नाही. (कोणतीही गोष्ट केल्याखेरीज त्यातील अडचणीची कल्पना येत नाही)
- घराची ओज अंगण सांगते - एखाद्याच्या अंगणाची परिस्थिती पाहून त्याच्या घरातील टापटीपपणा समजतो.
- घर ना दार देवळी बि-हाड - घरदार, बायको, मुलेबाळे, नसलेला एकुलता एक प्राणी.
- घरासारखा पाहुणा होतो, पण पाहुण्यासारखे घर होत नाही - पाहुण्याला घरच्यांच्या चालीरीती स्वीकाराव्या लागतात. घरच्याना पाहुण्याच्या चालीरीती स्वीकाराव्या लागत नाहीत.
- घर सारव तर म्हणे कोनाडे किती ? - आपल्याला दिलेले काम सोडून भलत्याच गोष्टीची विचारपूस करणे.
- घुसळती पेक्षा उकळतीच्या घरी अधिक - कष्ट करून पोट भरणा-या माणसांपेक्षा दुस-यांना लुबाडणारी माणसेच अधिक चैन करतात
- घोडा मैदान जवळ आहे - परीक्षेची वेळ जवळ आलेली आहे.
- घोडे खाई भाडे - घोड्याच्या भाड्याचे पैसे घोड्याच्या गवतासाठी जातात, फायदा काहीच नाही. तसेच फायदा नसलेला धंदा करण्यात अर्थ नाही.
- घर साकड आणि बाईल भाकड - घर भिकार आणि बायको कुरूप.
- घे सुरी आणि घाल उरी - फाजील उत्सुकता दाखविणे.
- घुगऱ्या मूठभर सारी रात भरभर - कमाई थोडी पण खर्चच फार.
- घरात नाही तीळ पण मिशांना देतो पीळ- ऐपत नसताना ऐट मारणे.
- घराला नाही कौल, रिकामा डौल - घरात गरिबी पण रिकामीच ऐट.
- घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे - स्वतः चा खर्च कमी करून इतरांची कामे करणे.
- घरासारखा गुण सासू तशी सून - लहान मोठ्यांचे अनुकरण करत असतात.
- घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी - भलेही ईश्वर आमच्यापासून दूर असेल; परंतु त्याचे लक्ष आमच्यावर आहे.
- घोडी मेली ओझ्याने व शिंगरू मेले हेलपाट्याने- आई काम करून थकते व तिचे मूल तिच्या मागे फिरून फिरून थकून जाते.
- घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर - एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग.
- घडाईत परीस मढाईच जास्त - बनवण्यापेक्षा दुरुस्तीचाच खर्च.
च
- चढेल तो पडेल आणि पोहेल तो बुडेल - आपल्या उत्कर्षासाठी धडपड करीत असता कधी अपयश आले तर कमीपणा वाटण्याचे कारण नाही.
- चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होतेच.
- चालत्या गाडीला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात अडथळा निर्माण करणे.
- चावडीवर दरवडा - ज्याला लोकांचे संरक्षण करावयाचे आहे त्याला स्वतःचेच रक्षण करता येत नाही.
- चोराचे पाऊल चोर जाणे - (चोराची पावले चोरांस ठाऊक) - चोरांची दुष्कृत्ये चोरानाच माहीत असतात.
- चोराच्या वाटा चोराला ठाऊक - चोराचे पाऊल चोर जाणे. चोरांची कृत्ये चोरांसच माहीत असतात.
- चोराच्या मनात चांदणे - जो कोणी दुष्कर्म करतो त्याला ते उघडकीस येईल अशी सारखी भीती वाटत असते.
- चोराच्या उलट्या बोंबा - स्वतः गुन्हा करून पुन्हा स्वतःच दुस-यांच्या नावाने आरडा ओरड करणे.
- चोरावर मोर - चोरापासूनच चोरी करणारा सवाई चोर.
- चोराच्या हातची लंगोटी - ज्याच्याकडून काहीही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडूनच काही मिळणे म्हणजे सुदैव.
- चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे (फाशी देणे) - ख-या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा करणे.
- चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही - लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
- चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ - मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.
- चिंती परा येई घरा - दुसऱ्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वतःचेच वाईट होते.
- चोराला सुटका आणि सावाला फटका-चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे.
- चोराची पाउले चोरालाच ठाऊक - वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात.
- चचोरीचा मामला हळूहळू बोंबला - पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायच.
- चालत्या गाड्याला वंगण कोणीही घालेल - ज्याच्याजवळ सर्वकाही आहे त्याला मदत करायला कोणीही तयार असते.
छ
- छडी लागे छम छम विद्या येई घमघम - शिक्षा केल्याने मुले अभ्यास करतात अशी जुन्या लोकांची समजून होती.
ज
- जनी जनार्दन - समाजाला जे प्रिय असते तेच परमेश्वरालाही प्रिय असते, बहुसंख्य लोकांचे म्हणणेच खरे मानावे.
- जन्माला आला हेला, पाणी वाहता मेला - बुद्धीच नसलेल्या माणसांच्या हातून कोणतेही काम धड होऊ शकत नसल्याने त्यांचा जन्म वाया जातो.
- जगी सर्व सुखी असा कोण आहे ? - आपल्याला सर्व सुखे मिळणे अशक्य, त्यामुळे जे मिळते त्यातच सामाधान मानले पाहिजे.
- जळते घर भाड्याने कोण घेतो ? - जी वस्तू स्वीकारल्याने आपले नुकसान होते हे स्पष्ट दिसत असता ती कोण स्वीकारील ?
- जळात (पाण्यात) राहून माशांशी वैर - ज्यांच्या सहवासात आपल्याला राहावयाचे आहे तेथे सलोख्याने राहावे, देश निर्माण होईल असे काही करू नये.
- जशी देणावळ तशी धुणावळ (दाम तसे काम) - पैसे जास्त दिले तर कामही चांगले होते.
- जन्मा घाली तो भाकर देईच - जो आपल्याला जन्माला घालतो, तो आपल्या पालन पोषणाची जबाबदारी घेतोच.
- जळत्या घराचा पोळता वासा - मोठ्या संकटात सापडलेल्या व्यक्तीकडून शक्य तेवढी मदत करून घेणे ही वृत्ती, त्याने सुद्धा त्याला दिलासा मिळतो.
- ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी - आपणावर जो उपकार करतो त्याच्याशी इमानदारीने वागावे, त्याच्याशी बेइमान होऊ नये.
- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - कोणत्याही गोष्टीची स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्याची पूर्ण कल्पना येत नाही.
- ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकाच ठिकाणचे लोक एकमेकांना पक्के ओळखून असतात.
- ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - भलेपणा सर्वत्र कामाला येत नाही. कोणाचे चांगले केले तर तोच आपल्यावर उलटण्याची शक्यता असते.
- ज्याचे कुडे त्याचे पुढे - दुस-यांचे वाईट करायला जो जातो त्याचेच वाईट होते.
- ज्याचे मन त्याला ग्वाही देते - ज्याने पाप केले असेल त्याचेच मन त्याला खात असते.
- ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल - जो स्वतः दुःखी असतो, तोच ते दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो.
- जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगी सुद्धा जाणार नाही - काही ठिकाणी कारण नसताना अधिक खर्च होतो, पण काही ठिकाणी अगदी क्षुल्लक गोष्टीतही काटकसर केली जाते.
- ज्याच्या मनगटात जोर तो बळी - मनगटाचे बळ पैशाच्या किंवा अधिकाराच्या बळापेक्षा श्रेष्ठ असते.
- जी खोड बाळा ती जन्मकाळा - बाळपणी लागलेल्या सवयी जन्मभर टिकतात.
- जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही - एखाद्याला वाईट सवय लागली तर ती मरे पर्यंत जाणे अशक्य असते.
- जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी - मुलांचा सांभाळ करणारी माताच जगाचा उद्धार करू शकते.
- जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही - बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.
- ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट - जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
- ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी- ज्याच्याजवळ खावयास प्यावयास आहे त्याला काम करण्याची गरज नसते.
- ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याला यश मिळाले तो कर्तबगार.
- जे न देखे रवि ते देख कवी - जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.
- जे चकाकते ते सोने नसते - ज्या वस्तु वरुन चकाकतात त्या सर्व सोन्याच्या केलेल्या असतात असे नाही.
- जे पिंडी ते ब्रम्हांडी - जी गोष्ट आपल्याकडे आहे ते सगळीकडे आहे.
- जे फार भुंकते ते चावरे नसते - जो मनुष्य फार बडबड करतो त्याच्या हातून काहीच होत नाही.
- जेथे जेथे घर तेथे तेथे अग्नी- कार्य आहे तेथे कारण असतेच.
- ज्याचे दळ त्याचे बळ - ज्या राष्ट्राजवळ सक्षम सैन्य असते ते राष्ट्री दुसऱ्यावर वर्चस्व गाजवते.
- जशास तसे- एकाने केले त्या प्रमाणे दुसन्याने वागणे जसा भाव तसा देव ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्या प्रमाणे फळ मिळते.
- जशी कामना तशी भावना - जशी मनात इच्छा असते तशीच भावना असते.
- जुने ते सोने - जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात.
- जगाच्या कल्याणा संताच्या विभूती- जे साधूपुरुष असतात ते जगाच्या कल्याणासाठी कार्य करीत असतात.
- जंगलात नाही वावर आणि वावरात नाही घर - ज्याच्या जवळ घरदार नाही असा मनुष्य.
- जसा गुरू तसा चेला- गुरू प्रमाणेच शिष्य.
- जशी नियत तशी बरकत - ज्याप्रमाणे आपली वागणूक असेल त्याच प्रमाणे आपल्याला फळ मिळते.
- जाती करता खावी माती - जातीसाठी जे करायचे ते करणे प्रसंगी खालच्या थरावर ही येणे.
- जात्यावर बसले म्हणजे ओवी सुचते - काम करावयास प्रारंभ केला की ते पूर्ण करण्याचे अनेक मार्ग सुचतात.
- जखम भरून येते पण व्रण कायम राहतात - आपल्यावर बेतलेल्या वाईट प्रसंगाची वाईट आठवण विसरत नाही.
- ज्याला नाही अक्कल त्याची बरोबर नक्कल -मूर्ख किंवा निर्बुद्ध माणसाचा घरोघरी उपहास होतो.
- जिकडे सुई तिकडे दोरा -प्रमुख व्यक्तीच्या मागे त्याच्या हाताखाली काम करणारे लोक असतात.
0 टिप्पण्या