महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ पेपर क्र. २

0%

खालील उतारा वाचून 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या.

गांधीजींनी अहिंसेचा एक तत्व म्हणून स्वीकार केला होता. अहिंसा हे गांधीजींच्या जीवनाचे एक अंगच होते. परंतु काँग्रेसमधील त्यांच्या बहुतेक समकालीनांना चित्तरंजनदास, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, आचार्य नरेंद्र देव आणि इतरांना अहिंसा ही एक धोरणात्मक बाब वाटत असे. राजकीय धोरण व राजकीय कृती या नात्याने अहिंसा ही काँग्रेसच्या रणनीतीचा एक अंगभूत भाग होती. खरे तर काही आवश्यक बाबतीत 'व्यापक जनसंघटनांच्या आधारे चालविण्यात येणारी एक वर्चस्ववादी चळवळ' या भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपाचा, अहिंसा एक अंगभूत भाग होती. वर्चस्ववादी जनआंदोलनाच्या स्वरूपामुळेच अहिंसा राष्ट्रीय चळवळीचा एक मूलभूत घटक ठरली होती.

चळवळीने अहिंसक प्रकार स्वीकारल्याने सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होता आले. हिंसक चळवळीमध्ये तिला अशा रीतीने सहभागी होणे शक्य झाले नसते. स्त्रियांच्या सहभागाबाबत ही गोष्ट विशेष खरी होती. सशस्त्र लढ्यात स्त्रियांना मोठ्या संख्येने सहभागी होणे अवघड गेले असते. तथापि, यातना सहन करण्याच्या, लाठीमाराला तोंड देण्याचा, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात तासन्तास निदर्शने करण्याच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा कदाचित अधिक प्रबळ होत्या. चळवळीच्या व राजकीय वर्तनाच्या अहिंसक प्रकाराचा संबंध वसाहतवादी राज्याच्या अर्ध-वर्चस्ववादी, अर्ध-एकाधिकारशाही स्वरूपाशी व ब्रिटनमधील राजकीय व्यवहाराच्या लोकशाही स्वभावाशी होता. सर्वात महत्वाचे म्हणजे नैतिक शक्तीच्या मैदानात लढणे असा अहिंसेचा अर्थ होता. सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळी वसाहतवादी अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकतात. शांतताप्रिय सत्याग्रहींवर बलप्रयोग झाल्यावर पाशवी शक्ती ही वसाहतवादी राज्याच्या सत्तेचा खरा आधार आहे, हे उघड होते. खरे तर, सर्वसामान्यांची चळवळ राज्यकर्त्यांसमोर एक शृंगापत्ती उभी करते. ती चळवळ शांततामय असल्याने दडपून टाकण्याची त्यांची तयारी नसल्यास ते आपल्या वर्चस्वाचा एक महत्वाचा भाग गमावून बसतात; कारण आंदोलनकर्ते प्रचलित वसाहतवादी कायद्याचा भंग करीतच असतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास वसाहतवादी सरकारने आपला प्रशासकीय अधिकार सोडला असून त्याची राज्य करण्याची क्षमता नाही, असाच संदेश त्यातून जातो. त्यांनी बलप्रयोगाने चळवळ दडपली, तरी त्यांचीच हार होते; कारण एका शांततापूर्ण चळवळीचा व अहिंसक मार्गाने कायदा मोडणाऱ्यांचा बंदोबस्त बलप्रयोगाने करणे नैतिकदृष्ट्या समर्थनीय ठरत नाही. जनसामान्यांच्या अहिंसावादी चळवळीसमोर राज्यकर्त्यांचा कधीच विजय होत नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय चळवळीकडे विजयी होणारी रणनीती असते. सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो. तिच्यापुढे अर्ध-लोकशाही राजवटीची काहीच मात्रा चालत नाही. व्यवहारात वसाहतवादी अधिकारी नेहमीच दोलायमान अवस्थेत हेलकावत राहतात आणि शेवटी बहुतेक वेळा चळवळ दडपून टाकतात. अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने त्यांची प्रतिमा डागाळते; एक प्रकारे त्यांच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो. ताकद व जबरदस्ती हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते. परिणामी वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो.

प्रश्न 1: सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळी वसाहतवादी अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकतात, कारण
(1) जनसामान्यांच्या अहिंसक चळवळीसमोर राज्यकर्त्यांचा कधीच विजय होत नाही.
(2) सर्वसामान्यांची चळवळ राज्यकर्त्यांसमोर एक शृंगापत्ती उभी करते.
(3) शांतताप्रिय सत्याग्रहींवर बलप्रयोग झाल्यावर पाशवी शक्ती ही वसाहतवादी राज्याच्या सत्तेचा खरा आधार आहे, हे उघड होते.
(4) वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो.

प्रश्न 2: खालील विधाने वाचा :

a. 'व्यापक जनसंघटनांच्या आधारे चालविण्यात येणारी एक वर्चस्ववादी चळवळ' असे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप होते.
b. वर्चस्ववादी जनआंदोलनाच्या स्वरूपामुळेच अहिंसा राष्ट्रीय चळवळीचा एक मूलभूत घटक ठरली होती.
c. चळवळीचे अहिंसक प्रकार स्वीकारल्याने सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होता आले.

या विधानांमधील कार्यकारण संबंध ओळखा.
(1) b हे विधान a चे कारण आहे
(2) a हे विधान b चा परिणाम आहे
(3) c हे विधान a चे कारण आहे
(4) c हे विधान b चा परिणाम आहे

प्रश्न 3: असत्य विधान ओळखा.
(1) सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो.
(2) वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो.
(3) अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने वसाहतवादी राजवटीच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो.
(4) लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते.

प्रश्न 4: स्त्रियांना भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभागी होता आले, कारण
(1) भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपाचा, अहिंसा एक अंगभूत भाग होती.
(2) हिंसक चळवळीमध्ये स्त्रियांना सहभागी होणे शक्य नव्हते.
(3) सशस्त्र लढ्यात स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
(4) नैतिक शक्तीच्या मैदानात लढणे असा अहिंसेचा अर्थ होता.

प्रश्न 5: असत्य विधान ओळखा.
(1) सर्वसामान्यांची चळवळ राज्यकर्त्यांसमोर एक शृंगापत्ती उभी करते.
(2) वसाहतवादी कायद्यांचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई न केल्यास वसाहतवादी सरकारची राज्य करण्याची क्षमता नाही, असाच संदेश त्यातून जातो.
(3) बलप्रयोगाने चळवळ दडपली तरी सरकारचीच हार होते.
(4) एका शांततापूर्ण चळवळीचा व अहिंसक मार्गाने कायदा मोडणाऱ्यांचा बंदोबस्त बलप्रयोगाने करणे नैतिकदृष्ट्या असमर्थनीय ठरत नाही.

खालील उतारा वाचा आणि त्याखालील प्रश्न क्र. 6 ते 10 ची उत्तरे द्या.

स्थलांतरामुळे ज्या अनेक समस्या निर्माण होतात, त्यातील 'बुद्धीवंतांचे स्थलांतर' ही एक गंभीर समस्या आहे. बुद्धीवंतांच्या स्थलांतराचा गरीब, अविकसित देशांना मोठा फटका बसतो व श्रीमंत, विकसित देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. गरीब, अविकसित देश सामाजिक बांधिलकीचा विचार करून, शैक्षणिक सुविधा गरिबांनाही उपलब्ध व्हाव्यात, म्हणून शिक्षण अतिशय स्वस्त राहील, याची काळजी घेतात. म्हणजेच तज्ञांच्या शिक्षणावर समाज मोठ्या प्रमाणात खर्च करतो. तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते, वैद्यकीय व्यावसायिक यांच्या शिक्षणावर गरीब देश समाजाची गरज म्हणून खूप मोठा खर्च करतात. परंतु पदवी मिळाल्याबरोबर हे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते, वैद्यकीय व्यावसायिक जास्त पगाराच्या आशेने व जास्त चांगले काम करण्याची संधी व सुविधांमुळे श्रीमंत, विकसित देशाकडे धाव घेतात. वैयक्तिक, व्यक्तीचा विचार केला असता, हा निर्णय योग्य म्हणता येईल. परंतु ज्या समाजाने त्यांना जवळजवळ फुकट शिक्षण देऊन तंत्रज्ञ बनविले, त्या समाजाची कोणतीही सेवा न करता ते विकसित देशांत स्वतःच्या फायद्यासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे अविकसित देशांचे मोठे नुकसान होते व विकसित देशांना तंत्रज्ञ बनविण्यावर कोणताही खर्च न करता तयार तंत्रज्ञ मिळतात. त्यामुळे त्यांची विकासाची गती अधिक वेगवान होते. याउलट, ज्या गरीब देशांनी या तंत्रज्ञ निर्मितीसाठी भांडवल गुंतवणूक केलेली असते, त्यांना या तंत्रज्ञांच्या कौशल्याचा फायदा होत नाही व त्यामुळे देशाच्या विकासाचा वेग मंदावतो.

उदा. भारतातून अनेक वैद्यक व्यावसायिक अतिशय स्वस्त दरात शिक्षण घेऊन इंग्लंड-अमेरीकेत जातात. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा तेथील समाजाला होतो. परंतु आपल्या देशातील अनेक गरीब, खेडुतांना वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागते. इंग्लंडमधील सार्वजनिक वैद्यकीय सेवेत इतके भारतीय वैद्यकीय व्यावसायिक आहेत, की ते जर भारतात परत आले, तर इंग्लंडमधील सार्वजनिक वैद्यकीय सेवा कोलमडून पडेल. तसेच, असे तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ भारतातून अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर गेले आहेत, की तेवढे तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ उपलब्ध होण्यासाठी अमेरिकेला अशा कित्येक शैक्षणिक संस्था स्थापाव्या लागतील. ते करण्याऐवजी, अशा तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांना जास्त पगार व उत्तम सुविधा देऊन आकर्षित करण्याचा विकसित देश प्रयत्न करतात. हा अविकसित देशांवर एक प्रकारचा अन्यायच आहे.

बुद्धीवंतांच्या स्थलांतराचा काही विशिष्ट परिस्थितीत मात्र दोन्ही समाजांना फायदाच होतो. एखाद्या देशात तंत्रज्ञांचा पुरवठा तेथील विकासाची पातळी व त्यामुळे उत्पन्न झालेली व्यावसायिक संधी व मागणी याहून जास्त असतो, तेव्हा त्या तंत्रज्ञांना त्यांच्या देशात व्यवसायाची पुरेशी संधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असते व त्यांच्या व्यावसायिक विकासाला वाव मिळत नाही. असे तंत्रज्ञ जेव्हा स्थलांतर करतात, तेव्हा त्यांचा वैयक्तिक फायदा तर होतोच, परंतु दोन्ही समाजाचाही फायदा होतो. कारण या स्थलांतराने त्यांच्या जन्मभूमीतील बेकारीची समस्या सोडविण्यास मदत होते. तसेच, ज्या देशात ते स्थलांतर करतात, त्या देशातील विकासाच्या गतीची गरज भागविली जाते. या स्थलांतरामुळे त्याच्या जन्मभूमीत मौल्यवान परकीय चलनही उपलब्ध होते. या दोहोंचा जागतिक पातळीवर विकासाची गती वाढविण्यासाठी उपयोग होतो.

प्रश्न 6: अतिरिक्त बुद्धीवंतांच्या स्थलांतराचे फायदे कोणते ?

अ. परकीय चलन उपलब्ध होते.
ब. बेकारीची समस्या सोडविण्यास मदत होते.
क. स्वदेशाच्या विकासाला गती प्राप्त होते.
ड. स्वदेशाची लोकसंख्या कमी होण्यास मदत होते.
(1) फक्त अ
(2) फक्त अ आणि ब
(3) फक्त अ, ब आणि क
(4) फक्त अ, क आणि ड

प्रश्न 7: बुद्धीवंतांचे स्थलांतर खालीलपैकी कोणत्या कारणांनी होते ?

अ. जास्त पगाराच्या अपेक्षेने.
ब. नोकरीची चांगली संधी व सुविधा मिळतात म्हणून.
क. दुसऱ्या देशाचा विकास व्हावा म्हणून.
ड. केवळ पर्यटनासाठी.
(1) फक्त अ
(2) फक्त अ व ब
(3) फक्त ब व क
(4) वरील सर्व

प्रश्न 8: वरील उताऱ्यानुसार खालीलपैकी कोणते एक वाक्य चुकीचे आहे ?
(1) भारतातील अनेक वैद्यक इंग्लंड, अमेरिकेत जातात.
(2) भारतातील गरीब खेडूतांना वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागते.
(3) जपानमधील वैद्यक सेवेसाठी भारतात येतात.
(4) जर इंग्लंडमधील भारतीय वैद्यक परत आले तर त्यांची वैद्यकीय सेवा कोलमडून पडेल.

प्रश्न 9: बुद्धीवंतांचे स्थलांतर हे कशा प्रकारे होते ?

अ. अविकसित देशाकडून विकसित देशाकडे.
ब. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे.
क. अविकसित देशाकडून अविकसित देशाकडे.
ड. विकसित देशाकडून अविकसित देशाकडे.
(1) फक्त अ
(2) फक्त अ आणि ब
(3) फक्त अ आणि ड
(4) फक्त ब, क आणि ड

प्रश्न 10: बुद्धीवंतांच्या स्थलांतराचे तोटे कोणते ?

अ. तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्या शिक्षणावर केलेला खर्च वाया जातो.
ब. त्यांच्या स्थलांतरामुळे लोकसंख्या कमी होते.
क. स्थलांतरितांच्यामुळे त्या देशांच्या लोकसंख्येतील वाढीमुळे समस्या निर्माण होतात.
ड. स्वदेशाच्या विकासात अडथळा येतो.
(1) फक्त अ
(2) फक्त अ आणि ब
(3) फक्त ब आणि क
(4) फक्त अ आणि ड

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. 11 ते 15 यांची उत्तरे द्या.

एकविसाव्या शतकात पर्यावरणाचा प्रश्न काय स्वरूपात असेल ? हा विचार करणे, एकतर अगदी सोप आहे किंवा अतिशय अवघड आहे. हे वाक्य विरोधाभासाचे उत्तम उदाहरण आहे, असे आपल्याला वाटेल. पण ते पूर्ण विचारांती लिहिलेलं वाक्य आहे. पर्यावरणचा प्रश्न हा तसा मानवसापेक्ष आहे, म्हणजे तो आपल्याला वाटतो, म्हणून आहे. पृथ्वीचा इतिहास बघितला तर मी काय म्हणतो, हे लक्षात येईल. पृथ्वीचे जे अनेक कालखंड होते, त्यामध्ये लक्षावधी वर्षे नांदणारे सजीव निर्माण होत होते. ते प्राणी कोट्यावधी वर्षे पृथ्वीवर नांदत होते आणि कालांतराने नष्ट होत होते. अगदी सुरवातीच्या काळात हे सजीव सागरात वाढत होते. क्रिटेशियस कालखंडात सजीव हळूहळू जमिनीवर आले. त्यांची शरीर रचना जटील बनत गेली. या काळात ट्रायलोबाईट नावाचे काही प्राणी होते. त्या प्राण्यांना भरपूर सागरतळ उपलब्ध होता. पण काही कोटी वर्षे पृथ्वीवर वावरल्यानंतर, हे प्राणी नामशेष झाले. एवढेच नव्हे तर, त्यांच्या बरोबरचे इतर बरेच सजीवही नाहीसे झाले.

यानंतरच्या काळात ही, बरेच प्राणी नाहीसे झालेले पहावयास मिळते. डायनोसॉर वर्गीय प्राण्यांनी जवळजवळ 16 कोटी वर्षे पृथ्वीवर निरंकुश सत्ता गाजवली, असे म्हणता येईल. आज ते अस्तित्वात नाहीत. एवढेच नव्हे तर, त्या काळातील अनेक वनस्पतीही आज अस्तित्वात नाहीत. यानंतरच्या काळात मॅस्टेडॉन, खडगदंती इत्यादी प्राणीही नामशेष झाले. ते प्राणी तर पृथ्वीवर मानव अस्तित्वात आल्यानंतरच्या काळातही अस्तित्वात होते. मात्र त्यांचा नामशेष होण्यासाठी मानव कारणीभूत ठरलेला नाही, हे लक्षात ठेवायला हवे. मात्र हे सर्व सजीव नामशेष झाले, ते त्या काळातील पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामूळे, हे सर्वजण मान्य करतात. म्हणजे विशिष्ट परिस्थितीत कोणत्या तरी नैसर्गिक कारणाने पर्यावरणातील आदर्श परिस्थितीत एकाएकी बदल होवून बरेच प्राणी नाहीसे झालेले दिसतात. हे बरेचदा घडलेले आहे. हिमयुगानंतर काही वेळा प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या नव्या जाती निर्माण झाल्या, असे आढळून येते. त्याचप्रमाणे ज्वालामुखी, भूकंप, यानंतर स्थानिक पर्यावरणात बदल घडून स्थानिक परिस्थिती बदलल्याची उदाहरणे दिसतात.

पर्यावरणाचा एक प्रश्न गेल्या शंभर वर्षातला म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरचा आहे. औद्योगिक क्रांतीमुळे आपण निसर्गाची लूट करू शकतो, हे गेल्या शंभर वर्षात आपल्या लक्षात आले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्याला अनेक गोष्टीची प्रचंड मोठ्या प्रमाणात गरज भासली. या बरोबरच वैद्यकिय ज्ञानही वाढले. लोकसंख्येला तोंड द्यायचे तर जंगलतोड अनिवार्य होती. शहरे व खेडी पसरली. यामुळे जंगलाचा ऱ्हास झाला. हे आता सर्वच पर्यावरण अभ्यासकांना माहीत आहे.

आपण पूर्वीचे दाखले घेतो, त्यात वाढती संख्या हे प्रजाती विनाशाचं कारण गृहीत धरले जाते. पण कुठेही इतक्या झपाट्याने म्हणजे मानव जात ज्या झपाट्याने वाढली आहे, त्या झपाटयाने प्राणीजात वाढल्याचे उदाहरण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या प्राणिजातींनी वातावरण प्रदूषित करून पर्यावरणाचा प्रश्न निर्माण केल्याचेही दाखले अजून मिळालेले नाहीत. याउलट निसर्गात 'जगा आणि जगू दया' हेच तत्व वाढलेले दिसते. कारण नैसर्गिक अवस्थेतले प्राणी हे एका अन्नसाखळीतले दुवे असतात आणि त्यांची अन्न साठवायची पद्धत म्हणजे आपले भक्ष जगू देणे त्याला सुखेनैव वाढू देणे. भक्ष्याचं प्रमाण काही कारणांने कमी झाले तर, उदाहरण घ्यायचे तर, गवत कमी झाले तर निसर्गतःच हरणं व ससे कमी होतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर जगणारे पशूपक्षी आपले प्रजोत्पादन घटवतात, कमी करतात. तेंव्हा हे जूने दाखले आणि आपण करत असलेली पर्यावरणाची हानी यांच्यामध्ये तफावत आहे, हे लक्षात यायला हरकत नाही.

प्रश्न 11: कोणत्या कारणामुळे पृथ्वीवरील मॅस्टेडॉन, खडगदंती, इ. प्राणी नामशेष झाले ?

अ. अतिरेकी मानवी हस्तक्षेप
ब. पर्यावरणीय समतोल ढासळल्यामुळे
क. प्राण्यांच्या शिकारीमुळे
ड. वरीलपैकी सर्व
(1) अ आणि ब बरोबर आहेत
(2) ब आणि क बरोबर आहेत
(3) फक्त ब बरोबर आहे
(4) ड बरोबर आहे

प्रश्न 12: या उताऱ्यानुसार कोणत्या कालखंडात सजीव प्राणी हळूहळू जमिनीवर आले ?
(1) ट्रायसिक कालखंड
(2) क्रिटेशियस कालखंड
(3) नियोजीन कालखंड
(4) क्वाटर्नरी कालखंड (चतुर्थकल्प)

प्रश्न 13: या उताऱ्यावरून निसर्गात कोणते तत्त्व पाळलेले दिसून येते ?
(1) सुखेनैव वाढू न द्यावे
(2) जगा आणि जगू द्या
(3) पर्यावरण विकास
(4) पाणी अडवा, पाण्याची बचत करा

प्रश्न 14: डायनोसॉर वर्गीय प्राण्यांनी पृथ्वीवर किती वर्षे सत्ता गाजवली ?
(1) 26 कोटी वर्षे
(2) 16 कोटी वर्षे
(3) 06 कोटी वर्षे
(4) 61 कोटी वर्षे

प्रश्न 15: औद्योगिक क्रांतीमुळे निसर्गाची लूट झाली कारण ———.
(1) वाढत्या लोकसंख्येसाठी जंगलतोड गरजेची होती.
(2) शहरे पसरत गेली, जंगले कमी झाली.
(3) अनेक गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज भासली.
(4) वरीलपैकी सर्व.

खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्न क्र. 16 ते 20 उत्तरे लिहा.

जागतिकीकरण आणि आर्थिक विषमता

अधिकाधिक लोकांच्या कल्याणाचा विचार करणे हे समाजाचे व अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असते. परंतु बाजारव्यवस्थेत क्रयशक्ती निर्णायक असते. रोजगार वृद्धीचा घटता दर आणि दारिद्रयामुळे महत्तम नफ्याच्या दृष्टीने निर्णय घेणारी उत्पादन यंत्रणा गरिबांच्या गरजांची दखल घेत नाही. सामान्यतः आरामदायक जीवनासाठी पर्याय आणि संधीचा अभाव म्हणजे दारिद्रय. सन 2016 च्या मानव विकास अहवालानुसार, भारतातील 55 प्रतिशत लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्यात जगत आहे, तर 28 प्रतिशत लोकसंख्या तीव्र दारिद्र्यात जगत आहे. रोजगार हे दारिद्रय निर्मूलनाचे मूलभूत साधन आहे. जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत खाजगीकरणाच्या महत्वामुळे खाजगी क्षेत्रातील रोजगार वाढलेला असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार घटलेला आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वृद्धी प्रमाणेच उत्पन्न विषमतेत घट हे नियोजनबद्ध विकासाचे एक उद्दिष्ट होते. वेगवान उत्पादन वाढीच्या प्रयत्नात त्याला फारसे महत्व दिल्याचे कधीच आढळले नाही. जागतिकीकरणानंतर तर आर्थिक विषमतेची तीव्रता वेगाने वाढली. विषमतेची कल्पना देशातील भिन्न उत्पन्न वर्गाच्या उपभोग खर्चातील तसेच संपत्तीवरील मालकीतील वाटयाच्या प्रमाणावरून येते.

जागतिकीकरणापूर्वी 1961 ते 1991 या काळात दहा प्रतिशत सर्वोच्च उत्पन्न गटाचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा तीन प्रतिशतने घटला होता. मध्यम चाळीस प्रतिशत व तळाच्या पन्नास प्रतिशत उत्पन्न गटाचा वाटा अनुक्रमे 2.3 प्रतिशत व एक प्रतिशतने का असेना परंतु वाढला होता. जागतिकीकरणानंतर मात्र दहा प्रतिशत सर्वोच्च उत्पन्न गटाचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 1991 ते 2019 याकाळात 34 प्रतिशत वरुन 56 प्रतिशत झाला तर तळाच्या 50 प्रतिशत लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 22 प्रतिशत वरुन 14.7 प्रतिशत पर्यंत घटला म्हणजेच विषमता वृद्धीची गती तीव्र झाली. सर्वोच्च दहा प्रतिशत उत्पन्न गटाचा देशाच्या एकूण संपत्तीतील वाटा 1991 ते 2019 या काळात 50 प्रतिशतवरुन 74 प्रतिशतपर्यंत वाढला तर याच काळात तळाच्या 50 प्रतिशत लोकसंख्येजवळील देशातील संपत्तीचा मुळातच नाममात्र असलेला 8.8 प्रतिशत वाटा 2.8 प्रतिशत पर्यंत घटला. देशाची 74 प्रतिशत संपत्ती 10 प्रतिशत लोकसंख्येच्या ताब्यात तर 50 प्रतिशत लोकसंख्येकडे केवळ 2.8 प्रतिशत संपत्तीची मालकी राहिली. दारिद्र्य, रोजगार व विषमतेसंबंधातील या सगळ्या स्थितीवरुन महत्तम सामाजिक कल्याणाच्या स्थितीपासून आपण अधिकाधिक दूर जात असल्याचे वास्तव सुस्पष्ट होते.

प्रश्न 16: जागतिकीकरणापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नातील मध्यम 40% उत्पन्न गटाचा वाटा किती प्रतिशत वाढला होता ?
(1) 3.3 प्रतिशत
(2) 2.3 प्रतिशत
(3) 8.8 प्रतिशत
(4) 2.8 प्रतिशत

प्रश्न 17: विषमता वृद्धीची गती तीव्र झाल्याचे खालीलपैकी कोणत्या बाबीवरून स्पष्ट होते ?

अ. तळाच्या 50% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
ब. सर्वोच्च उत्पन्न असलेल्या 10% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
क. दोन्ही स्तरावरील लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात घट
ड. दोन्ही स्तरावरील लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यात वाढ
(1) फक्त 'अ'
(2) फक्त 'ब'
(3) 'ब' आणि 'क'
(4) 'अ', 'ब', 'क' आणि 'ड'

प्रश्न 18: जागतिकीकरणात महत्तम सामाजिक कल्याणापासून आपण दूर गेल्याची स्थिती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसून येते ?
(1) दारिद्र्य
(2) रोजगार
(3) विषमता
(4) वरील सर्व

प्रश्न 19: भयानक विषमता खालीलपैकी कशाला म्हणता येईल ?
(1) 10% लोकसंख्येच्या ताब्यात 74% संपत्ती
(2) 50% लोकसंख्येच्या ताब्यात 2.8% संपत्ती
(3) 10% लोकसंख्येच्या ताब्यात 74% आणि 50% लोकसंख्येच्या ताब्यात 2.8% संपत्ती
(4) राष्ट्रीय उत्पन्नातील श्रीमंतांचा वाटा 34% वरून 56% इतकी वाढ

प्रश्न 20: जागतिकीकरणामुळे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील रोजगार कमी झाला आहे ?
(1) खाजगी
(2) सेवा
(3) सार्वजनिक
(4) लघुउद्योग

खालील उतारा वाचून प्र. क्र. 21 ते 25 ची उत्तरे लिहा.

व्यवस्थापक काय करतात याचा विचार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कौशल्ये किंवा क्षमता पाहणे ज्या त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आहेत. प्रभावी पासून अप्रभावी व्यवस्थापकांमध्ये फरक करणारी अनेक कौशल्ये संशोधकांनी ओळखली आहेत. तांत्रिक कौशल्यांमध्ये विशेष ज्ञान किंवा कौशल्य लागू करण्याची क्षमता समाविष्ट असते. जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनीअर किंवा ओरल सर्जन यांसारख्या व्यावसायिकांच्या कौशल्यांचा विचार करता, तेव्हा तुम्ही विशेषतः त्यांनी व्यापक औपचारिक शिक्षणाद्वारे शिकलेल्या तांत्रिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करता, अर्थात, तांत्रिक कौशल्यांवर व्यावसायिकांची मक्तेदारी नसते आणि सर्व तांत्रिक कौशल्ये शाळा किंवा इतर औपचारिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शिकण्याची गरज नसते. सर्व नोकऱ्यांना काही विशेष कौशल्याची आवश्यकता असते आणि बरेच लोक नोकरी करताना त्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित करतात.

वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये इतर लोकांना समजून घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, प्रेरित करण्याची आणि मदत करण्याची क्षमता म्हणजे मानवी कौशल्य होय. बरेच लोक तांत्रिक कौशल्यामध्ये निपुण असतात परंतु ते चांगले श्रोते नसतात, इतरांच्या गरजा समजू शकत नाहीत किंवा संघर्ष हाताळण्यात कमकुवत असतात. कारण व्यवस्थापक इतर लोकांद्वारे कामे करतात, त्यामुळे त्यांच्याकडे चांगली मानवी कौशल्ये असणे आवश्यक आहेत.

व्यवस्थापकांकडे जटिल परिस्थितींचे विश्लेषण आणि निदान करण्याची मानसिक क्षमता असणे आवश्यक आहे. या कामांसाठी वैचारिक कौशल्ये आवश्यक असतात. उदाहरणार्थ, निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकांनी समस्या ओळखणे, त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पर्यायी उपाय विकसित करणे, त्या पर्यायी उपायांचे मूल्यांकन करणे आणि सर्वोत्तम पर्याय निवडणे आवश्यक आहे. व्यवस्थापकांनी कृतीचा मार्ग निवडल्यानंतर, कृतीची योजना करण्यास आणि नंतर ती अंमलात आणण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. अस्तित्वात असलेल्या प्रक्रियांसह नवीन कल्पना संकलित करण्याची आणि नोकरीमध्ये नाविन्यपूर्णता आणणे ही देखील आजच्या व्यवस्थापकांसाठी महत्त्वपूर्ण वैचारिक कौशल्ये आहेत.

प्रश्न 21: मानवी कौशल्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कौशल्यांचा समावेश होतो ?
(1) इतर लोकांना समजून घेणे
(2) इतरांशी संवाद साधणे
(3) इतरांना मदत करणे
(4) वरील सर्व

प्रश्न 22: खालील पर्यायांपैकी कोणते विधान सत्य नाही ?
(1) तांत्रिक कौशल्यांमध्ये विशेष ज्ञान किंवा कौशल्य लागू करण्याची क्षमता समाविष्ट असते.
(2) तांत्रिक कौशल्यांवर व्यावसायिकांची मक्तेदारी नसते.
(3) सर्व तांत्रिक कौशल्ये शाळा किंवा इतर औपचारिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शिकण्याची गरज नसते.
(4) सर्व नोकऱ्यांना काही विशेष कौशल्याची आवश्यकता नसते.

प्रश्न 23: खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

अ. व्यवस्थापकांकडे जटिल परिस्थितींचे विश्लेषण आणि निदान करण्याची मानसिक क्षमता असणे आवश्यक आहे.
ब. निर्णय घेणे हे संकल्पनात्मक कौशल्य आहे.
क. नोकरीमध्ये नाविन्यपूर्णता आणणे हे व्यवस्थापकांसाठी महत्त्वपूर्ण संकल्पनात्मक कौशल्ये नाही.
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ, ब आणि क
(4) वरीलपैकी कोणतेही नाही

प्रश्न 24: खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अ. बरेच लोक तांत्रिक कौशल्यामध्ये निपुण असतात परंतु ते चांगले श्रोते नसतात.
ब. व्यवस्थापक इतर लोकांद्वारे कामे करतात.
क. व्यवस्थापकांकडे चांगली मानवी कौशल्ये असणे आवश्यक नाही.
(1) फक्त अ
(2) अ आणि ब
(3) अ आणि क
(4) अ, ब आणि क

प्रश्न 25: खालील विधानांचा विचार करा :

अ. व्यवस्थापक इतर लोकांद्वारे कामे करतात.
ब. व्यवस्थापकांकडे चांगली मानवी कौशल्ये असणे आवश्यक आहे.
(1) विधान अ बरोबर, ब चूक
(2) विधान अ आणि ब दोन्ही चूक
(3) वरीलपैकी विधान अ आणि ब बरोबर असून अ विधानाचे ब कारण आहे
(4) वरीलपैकी विधान अ आणि ब चूक असून ब विधानाचे अ कारण आहे

खालील उतारा वाचून प्र. क्र 26 से प्र. क्र. 30 ची उत्तरे द्या.

परिसंस्था

परिसंस्थेचे एक पारंपरिक उदाहरण म्हणजे एक लहान सरोवर किंवा तलाव. गोड्या पाण्यातील तलावामधील जैवेतर किंवा अजैव भागांमध्ये पाणी, विरघळलेला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, फॉस्फेट्स, नायट्रेट्स आणि सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियमचे क्लोराईड्स तसेच अमिनो आम्ल, हयुमिक आम्ल इत्यादी. जैविक संयुगे यांचा समावेश होतो. गोड्या पाण्यातील तलावाचा सजीव भाग त्यामधील जीवांच्या कार्यांनुसार उपविभागीत केला जाऊ शकतो, म्हणजेच त्या जीवांचे कार्य संपूर्ण परिसंस्थेला एक सुसंगत व स्थिर प्रणाली म्हणून चालवण्यात कसे योगदान देते त्यानुसार गोड्या पाण्यातील तलावात दोन प्रकारचे उत्पादक असतात किनाऱ्यालगत उगम पावणारी किंवा पाण्याच्या उथळ भागात तरंगणारी मोठी वनस्पती आणि सूक्ष्म वनस्पती, ज्या बहुतेकपणे शेवाळे असतात व प्रकाश जिथपर्यंत पोहचतो तिथवर सगळीकडे पाण्यात वितरित झालेल्या असतात. या छोट्या वनस्पतींना एकत्रितपणे "फायटोप्लँकटन" असे म्हटले जाते. त्या सामान्यतः मोठ्या प्रमाणावर उपस्थित नसल्यास दिसून येत नाहीत, पण मोठ्या प्रमाणात असतील तर पाण्याला हिरवट छटा देतात. फायटोप्लँक्टन गोड्या पाण्यातील परिसंस्थेसाठी अन्न उत्पादक म्हणून अधिक महत्त्वाचे असतात.

तलाव परिसंस्थेतील मॅक्रोकंझ्यूमर्स किंवा फॅगोट्रॉफ्समध्ये कीटक, कीटकांचे अळ्या, क्रस्टेशिया, मासे आणि काही वेळा गोड्या पाण्यातील शिंपले यांचा समावेश होतो. झूप्लँक्टन (प्राणी प्लँक्टन) आणि तलावाच्या तळाशी आढळणारे बेंथोस हे प्राथमिक भक्षक शाकाहारी असतात. दुय्यम भक्षक हे प्राथमिक भक्षक खाणारे मांसाहारी असतात. काही वेळा तृतीय भक्षक सुद्धा असू शकतात जे या मांसाहारी प्रजातींना खातात.

परिसंस्थेची पूर्तता सॅप्रोफाइटस् किंवा अपघटक जीवांच्या माध्यमातून होते, त्यामध्ये बॅक्टेरिया, फ्लॅजिलेट प्रोटोजोआन्स आणि बुरशी यांचा समावेश होतो. हे मृत उत्पादक व ग्राहक जीवांच्या पेशींमधील जैविक संयुगे अपघटित करून त्या सूक्ष्म जैविक रेणूंमध्ये रूपांतरित करतात, जे ते स्वतः वापरतात किंवा हरित वनस्पतींसाठी कच्चा माल म्हणून वापरले जाऊ शकतात.

प्रश्न 26: ज्या पोषण प्रणालीमध्ये जीव मृत व अपघटित पदार्थांचे अन्न म्हणून सेवन करतो, ती पोषण प्रणाली म्हणजे
(1) परोपजीवी पोषण
(2) सॅप्रोफायटीक पोषण
(3) सहजीवी पोषण
(4) होलोझोइक पोषण

प्रश्न 27: मृत उत्पादकांच्या पेशींमधील जैविक संयुगांचे विघटन करण्याची प्रक्रिया म्हणजे ————.

अ. आत्मसात करणे (Assimilation)
ब. जैववर्धन (Biomagnification)
क. संचयन (Accumulation)
ड. अपघटन (Decomposition)
(1) अ फक्त
(2) अ आणि ब फक्त
(3) क फक्त
(4) ड फक्त

प्रश्न 28: पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आढळणारे प्राथमिक भक्षक म्हणजे ———.

अ. फायटोप्लँक्टॉन
ब. पिकोप्लँक्टॉन
क. झूप्लँक्टॉन
ड. बॅक्टेरिओप्लँक्टॉन
(1) अ व ड फक्त
(2) क फक्त
(3) ब आणि क फक्त
(4) ड फक्त

प्रश्न 29: रिकामी जागा भरा.

गोड्या पाण्यामधील परिसंस्थेतील ——— घटकांमध्ये सूर्यप्रकाश, तापमान, विरघळलेला ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, खोली व पाण्याचा प्रवाह यांचा समावेश होतो.

अ. जैविक
ब. युफोटीक
क. प्रीबायोटीक
ड. अजैविक
(1) अ व क फक्त
(2) ब आणि क फक्त
(3) क फक्त
(4) ड फक्त

प्रश्न 30: गोड्या पाण्यातील तलावातील सजीव भागाचे उपविभाजन हे आहे.

अ. जीवांच्या कार्यानुसार
ब. जीवांच्या दर्जानुसार
क. जीवांच्या सेवानुसार
ड. जीवांच्या जीवनानुसार

वरीलपैकी कोणते विधान (विधाने) बरोबर आहेत ?
(1) अ फक्त
(2) अ आणि ब फक्त
(3) अ, ब आणि ड
(4) अ, ब, क आणि ड

खालील उतारा वाचून प्र. क्र. 31 ते प्र. क्र. 35 ची उत्तरे लिहा.

कार्बन हे एक अद्वितीय आणि अत्यंत अष्टपैलू मूलद्रव्य आहे. ज्याचे रासायनिक चिन्ह 'C' असून त्याचा अणुक्रमांक 6 आहे. हे विश्वातील सर्वाधिक आढळणाऱ्या मूलद्रव्यातील एक असून पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनाचा पाया आहे. कार्बन सर्व ज्ञात सजीवांमध्ये आढळतो आणि तो सेंद्रिय पदार्थाचा मुख्य घटक आहे. कार्बनचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतः सह आणि इतर विविध मूलद्रव्यांशी (जसे की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक आणि हॅलोजन्स) मजबूत सहसंयोजक बंध तयार करू शकतो.

कार्बनचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चतुष्क संयोजकता (tetravalency), म्हणजे तो चार सहसंयोजक बंध तयार करू शकतो. त्यामुळे तो विविध प्रकारे इतर अणूंशी जोडू शकतो-सरळ, शाखायुक्त किंवा वर्तुळाकृती साखळ्या तसेच दुहेरी, त्रैतीय बंध आणि त्रिमितीय संरचना तयार करतो. या गुणधर्माला कॅटनेशन (catenation) म्हणतात. यामुळे कार्बन असंख्य संयुगे तयार करू शकतो. प्रत्यक्षात, कार्बन सर्वात जास्त संयुगे तयार करणारे मूलद्रव्य आहे आणि ही सर्व संयुगे कार्बन संयुगे म्हणून ओळखली जातात.

कार्बन हा शुद्ध आणि संयुग स्वरूपात आढळतो. शुद्ध स्वरूपातील कार्बन म्हणजे हिरा आणि ग्रॅफाइट, जी कार्बनची अपरूप (allotropes) आहेत. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे, तर ग्रॅफाइट तरम, गुळगुळीत असून त्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो विद्युत वाहक आहे. फुलरीन्स (fullerenes) हे कार्बनचे आधुनिक अपरूप आहेत, ज्यामध्ये बकी बॉल्स आणि कार्बन नॅनोट्यूब्स यांचा समावेश होतो. यांचा उपयोग नॅनोतंत्रज्ञान आणि पदार्थ विज्ञानात मोठ्या प्रमाणात होत आहे. कार्बन संयुगे दोन मुख्य प्रकारांत विभागली जातात :

1. सेंद्रिय संयुगे : ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतात आणि त्यात ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक इत्यादी मूलद्रव्ये देखील असु शकतात. यामध्ये हायड्रोकार्बन्स (उदा. मिथेन, ईथेन, प्रोपेन), अल्कोहोल्स, आम्ल आणि पॉलिमर (जसे प्लास्टिक, रबर) यांचा समावेश हातो. सेंद्रिय संयुगे जैविक प्रणालीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आणि प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स व न्यूक्लिक अॅसिड्स (DNA आणि RNA) सारख्या रेणूंचा पाया बनवतात. याशिवाय ती उद्योगामध्ये इंधन, रंगद्रव्ये, औषधे, कीटकनाशके आणि प्लास्टिक तयार करण्यासाठीही वापरली जातात.

2. असेंद्रिय संयुगे : ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड (CO₂), कार्बन मोनॉक्साइड (CO), कार्बोनेट्स (उदा. चुनखड्यातील कॅल्शियम कार्बोनेट), आणि बायकार्बोनेट्स यांचा समावेश होतो. ही संयुगे पर्यावरणीय प्रक्रियांमध्ये, विशेषतः कार्बन चक्र (carbon cycle) मध्ये महत्वाची भूमिका बजावतात, जे पृथ्वीवरील कार्बनचे संतुलन राखण्यास मदत करते.

कार्बन संयुगांची विविध वैशिष्ट्ये असतात. बहुतांश सेंद्रिय संयुगांचे वितळबिंदू आणि उत्कलनबिंदू कमी असतात, ती सहज ज्वलनशील असतात आणि पाण्याऐवजी सेंद्रिय विद्रावकांमध्ये विद्राव्य असतात. त्यामुळे ती इंधन आणि औद्योगिक विद्रावक म्हणून उपयुक्त ठरतात. त्यांची विविधता आणि अभिक्रियाशीलता यामुळे ही संयुगे रसायनशास्त्र, विशेषतः औषधनिर्मिती आणि संश्लेषण शाखेत अत्यंत महत्वाची मानली जातात.

प्रश्न 31: कार्बन डायऑक्साइड आणि कार्बोनेट्स कोणत्या प्रकारची संयुगे आहेत ?
(1) सेंद्रिय संयुगे
(2) असेंद्रिय संयुगे
(3) धातवीय संयुगे
(4) आण्विक संयुगे

प्रश्न 32: खालीलपैकी कोणते विधान ग्रॅफाइट बाबत सत्य आहे ?
(1) हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे.
(2) तो नरम आणि गुळगुळीत आहे आणि विद्युत वाहित करतो.
(3) तो फक्त हिऱ्याची छेदन करण्यासाठी वापरला जातो.
(4) तो कार्बनचा कृत्रिम रूप आहे.

प्रश्न 33: कार्बनचा अणुक्रमांक किती आहे ?
(1) 04
(2) 06
(3) 08
(4) 12

प्रश्न 34: खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप (allotrope) नाही ?
(1) ग्रॅफाइट
(2) हिरा
(3) कार्बन डायऑक्साइड
(4) फुलरीन

प्रश्न 35: खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे कार्बन अनेक संयुगे तयार करू शकतो ?
(1) जास्त अणुभार
(2) आयनिक बंध तयार करण्याची क्षमता
(3) चतुष्क-संयोजकता आणि कॅटनेशन
(4) विकिरणशील स्वरूप

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 36 ते 40 ची उत्तरे द्या.

उद्देशपत्रिका ही संविधान ज्या मूलभूत तत्वज्ञानावर आणि मूलभूत मूल्यांवर राजकीय, नैतिक व धार्मिक, आधारित आहे त्याचे प्रतिक आहे. उद्देशपत्रिकेत संविधान सभेचे भव्य व उदात्त दृष्टिकोण आहे. ते देशाच्या संविधानाच्या निर्मात्याच्या स्वप्नांचे व आकांक्षाचे प्रतिबिंब आहे. संविधान निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे संविधान सभेचे सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या शब्दात "आपल्या संविधानाची उद्देशपत्रिका आपण इतके दिवस जे विचार करत होतो किंवा स्वप्न पाहत होतो, ती व्यक्त करते."

संविधान सभेच्या मसुदा समितीचे सदस्य के. एम. मुंशी यांच्या मते, 'उद्देशपत्रिका ही आपल्या सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताकाची कुंडली आहे'. संविधान सभेचे आणखी एक सदस्य ठाकुरदास भार्गव यांनी उद्देश पत्रिकेचे महत्व पुढील शब्दांत मांडले, उद्देशपत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे, तो संविधानाची आत्मा आहे. ती संविधानाची किल्ली आहे. ती संविधानात ठेवलेला रत्न जडित संच आहे. ती एक योग्य मापदंड आहे, ज्याद्वारे संविधानाचे मूल्य मोजता येते. एक प्रतिष्ठीत इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ अर्नेस्ट बार्कर यांनी उद्देशपत्रिकेच्या लेखकाच्या राजकीय ज्ञानाला भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांनी उद्देशपत्रिकेचे वर्णन संविधानाचे बीज (key note) असे केले आहे. उद्देशपत्रिकेतील मजकुराने ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्या लोकप्रिय ग्रंथ, प्रिन्सीपल्स ऑफ सोशल अॅण्ड पॉलिटिकल थिअरी (1951) च्या सुरुवातीला ते उधृत केले.

भारताचे माजी सरन्यायाधीश एम. हिदायतुल्ला यांनी निरीक्षण नोंदविले की, 'उद्धेशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे, परंतु ती केवळ एका घोषणेपेक्षा जास्त आहे. ती आपल्या संविधानाचा आत्मा आहे, जी आपल्या राजकीय समाजाचा नमुना मांडते. त्यात एक गंभीर संकल्प आहे, जो क्रांति शिवाय काहीही बदलू शकत नाही.

उद्देशपत्रिके बाबतचा एक वाद आहे की, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे किंवा नाही. बेरूबारी युनियन खटल्यात (1960), सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उद्देशपत्रिका संविधानातील अनेक तरतुदीमागील सामान्य उद्देश दर्शविते आणि त्यामुळे संविधान निर्मात्यांच्या मनाची गुरुकिल्ली आहे. शिवाय कोणत्याही अनुच्छेदामध्ये वापरलेले शब्द अस्पष्ट असतील किंवा एकापेक्षा जास्त अर्थ लावू शकतील, अशा ठिकाणी, उद्देशपत्रिकेत नमूद केलेल्या उद्दिष्टांमधून अर्थ लावण्यासाठी काही मदत घेतली जाऊ शकते. उद्देशपत्रिकेचे महत्व ओळखूनही, सर्वोच्च न्यायालयाने विशेषतः असे मत मांडले की, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही.

केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि उद्देशपत्रिका ही संविधानाचा एक भाग, असे म्हटले. उद्देशपत्रिका अत्यंत महत्वाची आहे आणि उद्देशपत्रिकेत व्यक्त केलेल्या भव्य आणि उदात्त दृष्टिकोनाच्या प्रकाशात संविधान वाचले पाहिजे आणि त्याचा अर्थ लावला पाहिजे असे निरीक्षण नोंदवले. एलआयसी ऑफ इंडिया खटला मध्ये (1995) देखील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असे म्हटले की, उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे.

प्रश्न 36: 'उद्देशपत्रिका ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे' असे कोणी म्हटले आहे ?
(1) एम. हिदायतुल्ला
(2) के. एम. मुंशी
(3) ठाकुरदास भार्गव
(4) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न 37: खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने "उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही" असे मत नोंदविले आहे ?
(1) केशवानंद भारती खटला
(2) बेरूबारी युनियन खटला
(3) गोलकनाथ खटला
(4) एल. आय. सी. ऑफ इंडिया खटला

प्रश्न 38: "प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अॅन्ड पॉलिटिकल थिअरी" हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
(1) पंडित ठाकूरदास
(2) के. एम. मुंशी
(3) ए. के. अय्यर
(4) अर्नेस्ट बार्कर

प्रश्न 39: 'उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे', असे कोणी म्हटले आहे ?

अ. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
ब. के. एम. मुंशी
क. ठाकुरदास भार्गव
ड. अर्नेस्ट बार्कर
ई. एम. हिदायतुल्ला
(1) फक्त क, ड
(2) फक्त ई, अ
(3) फक्त क, ई
(4) फक्त ब, अ

प्रश्न 40: अर्नेस्ट बार्कर, राजकीय विचारवंत, हे कोणत्या देशाशी निगडीत आहे ?
(1) इंग्लंड
(2) अमेरिका
(3) फ्रान्स
(4) जर्मनी

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. 41 ते 45 ची उत्तरे लिहा.

औद्योगिक क्रांतीमुळं व्यापार, मानवीसंबंध, समाजजीवन, संस्कृती, धर्म यांच्या स्वरूपांत आणि संकल्पनांत क्रांतिकारी बदल झाले. या गोष्टी अर्थातच प्रामुख्याने युरोपात झाल्या. यंत्रांच्या साहाय्याने वस्तूंचे उत्पादन अमाप प्रमाणात होऊ लागले. मोठ्या प्रमाणावर कामगारांची आवश्यकता निर्माण झाली. ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोकांना कामावर घेतले गेले. त्यातून राजाचे जे निसर्गदत्त अधिकार वा ईश्वरदत्त अधिकार म्हणा, ते संपले. एक नवा, मोठा व वेगळा संघटित वर्ग तयार झाला. यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माल तयार होऊ लागला तशी त्याला हुकमी गिऱ्हाईकांची, बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. या काळात युरोपातल्या बऱ्याच देशांच्या जगभर वसाहती होत्या. त्या वसाहतीतील पारंपरिक उद्योग मोडून काढून तिथं कृत्रिमरीत्या गरजा निर्माण करून आपला माल खपवणं या देशांना शक्य झालं. वसाहतीच्या देशात उपलब्ध होणारं स्वस्त मनुष्यबळ खरं म्हणजे कवडीमोलानं मिळणारं मनुष्यबळ - इकडून तिकडे सहज हलवता आलं. भारत, मॉरिशस, वेस्ट इंडिज बेटे किंवा ऑस्ट्रेलियाजवळ फिजी येथे अशाच गरजांपोटी पुष्कळ लोक नेण्यात आले. किंवा आफ्रिकेतून बोटींनी भरभरून काळी माणसे वेठबिगारी करण्यासाठी सध्याच्या अमेरिकेत नेण्यात आली. भारतात आपल्याकडं मांजरपाट नावाचा एक जाडाभरडा कपडा अगदी परवापर्यंत सुमारे चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत अगदी भरपूर मिळत असे. मांजरपाट हे मँचेस्टर क्लॉथचं देशी नामकरण. इथल्या हातमागावरचा उद्योग मोडकळीस आणून हे स्वस्त कापड इथं दीर्घकाळ वापरलं गेलं. डाक्क्याची महागडी मलमल आधीही जनसामान्य वापरत नव्हते. नंतर ती नाहीशीच झाली.

हे सारं बव्हंशी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतींमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्येच झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडेच झाली. सगळीकडे ती एकाच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनांच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळ्यात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगळ्या रस्त्यानं गुंतत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनीत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेनं अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडं फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर जर्मनांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धांमुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संस्थाने ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरिका असा करतो ती आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोवियत प्रजासत्ताके होती अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

प्रश्न 41: मँचेस्टर क्लॉथ मोठ्या प्रमाणात कोणत्या देशात मिळत होते ?
(1) अमेरिका
(2) भारत
(3) मॉरिशस
(4) ऑस्ट्रेलिया

प्रश्न 42: महायुद्धानंतर कोणत्या दोन महासत्ता उदयास आल्या ?
(1) अमेरिका-रशिया
(2) फ्रान्स-अमेरिका
(3) इंग्रज-भारत
(4) ग्रेट ब्रिटन-फ्रान्स

प्रश्न 43: औद्योगिक क्रांतीशी संबंधित तीन घटक प्रस्तुत परिच्छेदाच्या आधारे सांगा.
(1) कामगार, गिऱ्हाईक, बाजारपेठा
(2) माल, मनुष्यबळ, निसर्ग
(3) यंत्र, बाजारपेठा, सत्ता
(4) पैसा, यंत्र, सत्ता
प्रश्न 44: बाजारपेठांची उपलब्धता कोणत्या क्रांतीसाठी आवश्यक असते ?
(1) धार्मिक
(2) सांस्कृतिक
(3) सामाजिक
(4) औद्योगिक
प्रश्न 45: जर्मनांना इंग्रज-फ्रेंच यांचा पराभव करण्याची गरज का भासली ?
(1) सत्ता संपादन करण्यासाठी
(2) हुकमी बाजारपेठा मिळविण्यासाठी
(3) अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी
(4) हुकूमशाही निर्माण करण्यासाठी

Read the following passage carefully and answer the questions given below it. Q. No. 46-50

Carpenters from time immemorial must have known that tree trunks have rings, which give rise to the grain in a piece of wood. We find them mentioned by associates of Aristotle, but Leonardo da Vinci was the first person to suggest that as trees grow, they add a new ring every year. Today, we understand that when spring arrives and Vegetation comes alive after the dormancy of winter, the cells just inside the bark of a tree start to be divided. They produce large, thin - walled cells that we see as the light coloured material scientists call early wood. Later in the season, the growth slows down and the cells get smaller and thicker walled.This so called latewood looks darker and is what makes up the dark rings in a tree trunk. After the latewood forms, the tree becomes dormant again for the winter and the whole cycle repeats. The result is that many species carry in their trunks a series of alternating dark and light bands, each pair corresponding to a year's growth. These contrasting bands are most evident in conifers; distinctions between rings are not as pronounced in most temperate deciduous species and are absent in many tropical trees.

Trees are living archives, carrying within their structure a record not only of their age but also of precipitation and temperature for each year in which a ring was formed. The record might also include the marks of forest fires, early frosts and, incorporated into the wood itself, chemical elements the tree removed from its environment. Thus, if we only knew how to unlock its secrets, a tree could tell us a great deal about what was happening in its neighbourhood from the time of its beginning. Trees can tell us what was happening before written records became available. They also have a great deal to tell us about our future. The records of past climate that they contain can help us to understand the natural forces that produce our weather and this, in turn can help us plan.

Question 46: Complete the analogy.

Distinction : Distinct :: Structure : Structural

Wood : Wooden :: Cycle : ————
(1) Cyclic
(2) Cycling
(3) Encycle
(4) Encycling

Question 47: Which of the following statements are FALSE in the context of the given passage?

a. Aristotle told us that tree trunks add a new ring every year.
b. All types of trees contain dark and light bands.
c. Trees contain the record of their age only.
d. Human beings have unlocked all the secrets contained in trees.
(1) a, c, d
(2) a, b, c
(3) a, b, c, d
(4) a and d

Question 48: The word 'grain' in the passage means ————
(1) Fruit or seed of a cereal
(2) Small hard particle of substance
(3) Smallest unit of weight
(4) The natural pattern of lines in the surface of wood

Question 49: Match the following words in A with their meanings in B.

A B
a. archive i. raining / snowing
b. dormant ii. trees shedding their leaves annually
c. precipitation iii. a place where historical documents or records are kept
d. deciduous iv. alive but not growing
(1) a-iv, b-iii, c-ii, d-i
(2) a-iii, b-iv, c-i, d-ii
(3) a-iii, b-ii, c-iv, d-i
(4) a-iii, b-i, c-iv, d-ii

Question 50: The alternating dark and light bands are clearly seen in ————
(1) Tropical trees
(2) Deciduous trees
(3) Conifers
(4) All types of trees

प्रश्न 51: खालील विधान (A) आणि कारण (R) साठी योग्य पर्याय निवडा.

विधान (A) : एस्किमो इग्लू मध्ये राहतात.
कारण (R) : बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाहीत.
(1) (A) आणि (R) दोन्ही खरे आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
(2) (A) आणि (R) दोन्ही खरे आहेत परंतु (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
(3) (A) खरे आहे परंतु (R) खोटे आहे.
(4) (A) खोटे आहे परंतु (R) खरे आहे.

प्रश्न 52: एका पिशवीत 4 पांढरे, 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत. पिशवीतून यादृच्छिकपणे 3 बॉल काढायचे आहेत. ते सर्व लाल असण्याची शक्यता ——— आहे.
(1) 1/22
(2) 3/22
(3) 2/91
(4) 2/77

प्रश्न 53: खालील प्रश्नामध्ये दोन विधाने व दोन अनुमाने I, II दिलेली आहेत. दिलेली विधाने जरी वास्तवाशी विसंगत असली तरी सत्य आहेत असे समजा. त्यावरून दिलेल्या अनुमानांपैकी कोणते अनुमान / अनुमाने निघू शकतात ते ठरवा.

विधाने :
I. सर्व कागद पेन आहेत.
II. सर्व टेबल पेन आहेत.

अनुमाने :
I. काही टेबल कागद आहेत.
II. एकही टेबल कागद नाही.
(1) फक्त अनुमान I बरोबर
(2) फक्त अनुमान II बरोबर
(3) अनुमाने I व II दोन्ही बरोबर
(4) अनुमाने I व II दोन्ही चूक

प्रश्न 54: T हा P चा भाऊ आहे, R ही P ची मुलगी आहे, M ही T ची बहिण आहे, V हा R चा भाऊ आहे, तर V चा काका कोण ?
(1) M
(2) P
(3) T
(4) M किंवा T

प्रश्न 55: खालील श्रेणीमध्ये कोणत्या संख्या प्रश्नचिन्हांच्या जागी येतील ?

69, 53, 76, 46, 83, ?, ?, 32, 97
(1) 90, 39
(2) 39, 90
(3) 37, 93
(4) 39, 88

प्रश्न 56: गटात न बसणारे पद ओळखा.

तलाठी, सर्कल (मंडलाधिकारी), नायब तहसिलदार, उप-मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसिलदार, उप-जिल्हाधिकारी.
(1) नायब तहसिलदार
(2) उप-मुख्यकार्यकारी अधिकारी
(3) तहसिलदार
(4) सर्कल (मंडलाधिकारी)

प्रश्न 57: प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य तार्किक संख्या निवडा.

(1) 150
(2) 132
(3) 157
(4) 142

प्रश्न 58: एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 या प्रमाणात आहे. पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. तर पुरुष व स्त्रिया यांची एकूण संख्या किती ?
(1) 8,500
(2) 6,300
(3) 3,600
(4) 5,800

प्रश्न 59: जर 'R' हा 'भागाकार' दर्शवितो, 'T' हा 'बेरीज' दर्शवितो, 'W' हा 'वजाबाकी' दर्शवितो आणि 'B' हा 'गुणाकार' दर्शवितो तर

15 W 12 T 8 R 2 B 6 = ?
(1) 11/12
(2) 3 2/3
(3) 27
(4) 3

प्रश्न 60: आई व मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे सध्याचे वय किती ?
(1) 35, 10
(2) 70, 20
(3) 40, 13
(4) 49, 14

प्रश्न 61: दहा संख्यांची सरासरी 7 आहे. जर प्रत्येक संख्येला 15 ने गुणले तर संख्यांच्या नवीन संचांची सरासरी ———
(1) 105
(2) 150
(3) 180
(4) 170

प्रश्न 62: दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 45 पट आहे. जर एक संख्या 125 असून त्यांच्या मसावि आणि लसाविची बेरीज 1150 आहे, तर दुसरी संख्या ———
(1) 225
(2) 215
(3) 220
(4) 235

प्रश्न 63: एका संख्येच्या अडीच टक्के जर 8 असेल तर ती संख्या कोणती ?
(1) 320
(2) 310
(3) 230
(4) 330

प्रश्न 64: एका आयताची रुंदी a आणि लांबी b आहे. जर रुंदी 20% ने कमी केली आणि लांबी 10% ने वाढवली, तर नवीन आयताचे क्षेत्रफळ ab च्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे ?
(1) 80%
(2) 110%
(3) 88%
(4) 120%

प्रश्न 65: वाक्याचा अर्थ उत्तम अंमलात आणण्यासाठी योग्य शब्द निवडा.

"काहीतरी कमी किंवा तीव्र करणे"
(1) तीव्र करणे
(2) कमी करणे
(3) उत्तेजित करणे
(4) वाढविणे

वाचन करा आणि प्र. क्र. 66 ते 69 या प्रश्नांची उत्तरे द्या. स्मिताने तिचा विज्ञान प्रकल्प काळजी पूर्वक मोठ्या बॉक्समध्ये ठेवला. तिने तिच्या शिक्षकाने दिलेली चेकलिस्ट दोनदा तपासली, खात्री केली की तिच्या चार्ट्स, मॉडेल आणि स्पष्टीकरण पत्रक घेतले आहेत. तिची आई दारात छत्री घेऊन, ढगाळ आकाशाकडे चिंतेने पाहात होती. शाळेच्या प्रदर्शनास फक्त एक तास बाकी होता आणि त्यांना तिथे पोहोचण्यासाठी बाजारातून चालत जावे लागणार होते.

प्रश्न 66: उताऱ्यावर आधारित पुढे काय होऊ शकते ?
(1) स्मिता तिच्या चार्ट्स घरी विसरते
(2) तिचा प्रकल्प पावसात खराब होतो
(3) ती शाळेत येते आणि तिचे प्रदर्शन सेट करते
(4) तिचा शिक्षक प्रदर्शन रद्द करतो

प्रश्न 67: परिस्थितीत कोणती माहिती तातडी असल्याचा संदर्भ देते ?
(1) स्मिताच्या आईकडे एक छत्री होती
(2) प्रदर्शनाला फक्त एक तास आहे
(3) चेकलिस्टमध्ये चार्ट आणि एक मॉडेल समाविष्ट होते
(4) स्मिताने तिचा बॉक्स काळजीपूर्वक भरला

प्रश्न 68: "ढगांनी भरलेल्या आकाशाकडे चिंताग्रस्त नजरेने पाहणे" हा वाक्प्रचार स्मिताच्या आईबद्दल काय सूचवितो ?
(1) ती उशिरा पोहोचण्याबद्दल काळजीत आहे
(2) तिला स्मिताला जाऊ देण्याची इच्छा नाही
(3) ती हवामानाबद्दल चिंतित आहे
(4) तिने तिची छत्री विसरली आहे

प्रश्न 69: या उताऱ्यावर आधारित, स्मिताच्या तिच्या प्रकल्पाकडे असलेल्या वृत्तीत काय दर्शविले जाऊ शकते ?
(1) ती चिंताग्रस्त आणि तयारीशिवाय आहे
(2) ती उत्साही आहे पण अनिश्चित आहे
(3) ती पद्धतशीर आणि समर्पित आहे
(4) ती स्वारस्य नसलेली आणि सहज आहे

प्रश्न 70: वेन आकृतीच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

(1) भांडी - स्टील - पितळ
(2) जलचर - मासे - चिमणी
(3) शिक्षक - मानव - पदवीधर
(4) सर्व पर्याय बरोबर आहेत

प्रश्न 71: खालील संख्या क्रमाने लावून प्रश्नचिन्हाच्या जागेवर संख्या द्या.

48 : 513 :: 63 : ?
(1) 730
(2) 512
(3) 729
(4) 513

प्रश्न 72: खाली दिलेले शब्द इंग्रजी शब्द-कोषानुसार व्यवस्थित क्रमाने लावा.

I. Episode
II. Epistle
III. Episcope
IV. Epigraph
(1) I, II, III, IV
(2) IV, II, I, III
(3) III, II, I, IV
(4) IV, III, I, II

प्रश्न 73: एका टेबलावर गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र या सात विषयांची पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. तर इतिहास व भूगोल, तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल ?
(1) हिंदी
(2) विज्ञान
(3) इतिहास
(4) समाजशास्त्र

प्रश्न 74: रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?

4, 7, 11, 16, 22, 29, ——
(1) 35
(2) 37
(3) 40
(4) 36

प्रश्न 75: पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा.

2 4 8
3 9 ?
4 16 32
(1) 27
(2) 18
(3) 40
(4) 25

प्रश्न 76: तुम्ही महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहात. म.न.पा. हद्दीमध्ये प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात डिपॉझिट भरले नाही म्हणून अ‍ॅडमिट करून घेतले जात नाही. तुम्हाला समाज माध्यमांद्वारे ही बातमी कळते. दुर्दैवाने या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होतो.

अधिकारी म्हणून तुम्ही काय कराल ?
(1) रुग्णालय प्रशासनावर त्वरित कारवाई कराल.
(2) रुग्णालय बंद करण्याचे आदेश द्याल.
(3) भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून सर्व हॉस्पिटलला आदेश काढाल की अनामत रक्कम न घेताच आपत्कालीन उपचार द्यावे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई कराल.
(4) रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व विभाग प्रमुखांवर चौकशी सुरू करून निष्कर्षानुसार कार्यवाही कराल.

प्रश्न 77: मंजुरीसाठी पाच खाजगी निवासी आश्रम शाळांचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे आहे. एका मुलींच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती. सर्व विद्यार्थिनी खांद्यांत वाकून चालताना दिसल्या — एकाही मुलीला छताखाली ताठ उभे राहता येत नव्हते. तुम्ही कोणते निर्णय घ्याल ?
(1) दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते तेच पुरेसे आहे असा विचार करून शाळेला मंजुरी देईन.
(2) 'पुरेशा निधी अभावी या भागात शाळा चालवणे कठीण आहे' वस्तुस्थिती लक्षात घेऊन शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेन, पण त्याच वेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारत बांधल्यासच यापुढे मंजुरी मिळेल असे स्पष्ट करेल.
(3) सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेन.
(4) सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेन. पण त्याच वेळी संबंधित मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते साहाय्य करेन.

प्रश्न 78: राणी आणि रमेश एक विवाहित जोडपे होते. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर आहे. त्याचा वर्गमित्र रितेश आपल्या भावाची शिफारस घेऊन येतो व अधिकाराचा वापर करून नोकरी देण्याचा आग्रह करतो. राणी रमेशला मोठी रक्कम घेऊन छोटी नोकरी देण्यास सांगते. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ?
(1) रितेशचा भाऊ गरजू आहे म्हणून माझ्या अधिकाराचा वापर करून त्याला नोकरी देईन.
(2) मी रितेशला स्पष्टपणे सांगेन की मी त्याच्यासाठी असे काहीही करू शकत नाही.
(3) मी राणीने सांगितलेली ऑफर मान्य करेन.
(4) मी रितेशच्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगेन.

प्रश्न 79: प्रतिमा आणि कविता चांगल्या मैत्रिणी होत्या. इयत्ता 9 वीच्या विज्ञान पेपरात अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न होते. कविता व इतर मुलांनी परीक्षा हॉलमधून बाहेर पडले. प्रतिमाने परिस्थिती समजून घेऊन पेपर लिहिला. फक्त प्रतिमाच परीक्षेत पास झाली.

प्रतिमासंदर्भात तुमचे मत काय ?
(1) प्रतिमा ही आज्ञाकारक मुलगी आहे.
(2) प्रतिमा ही स्वार्थी मुलगी आहे.
(3) प्रतिमाला परीक्षेचे महत्त्व समजले आहे.
(4) प्रतिमा ही कधीच चांगली मैत्रीण होऊ शकत नाही.

प्रश्न 80: एका क्षेत्रातील जमीन सुपीक आहे परंतु मागील तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे आणि कर्ज फेडता न आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी परिस्थिती शासनाने कशी हाताळावी ?
(1) टँकरद्वारे जवळच्या नदीतून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याची शेतकऱ्यांसाठी मोफत सोय उपलब्ध करून द्यावी.
(2) शेतकऱ्यांना दुसरीकडे स्थलांतरित व्हायला सांगावे.
(3) शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा.
(4) राज्य, केंद्र सरकार आणि संबंधित पर्यावरण प्राधिकरणाच्या मान्यतेच्या अधीन राहून, नदीला त्या भागाशी जोडणारी एक जलवाहिनी तात्काळ बांधली जावी.

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या